Kasba byelection Result | कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासने यांचा तब्बल ११ हजार मतांनी पराभव केला. या निकालामुळे पुण्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे.

 

Eknath Shinde & Devendra Fadnavis
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस

हायलाइट्स:

  • २८ वर्षे या मतदारसंघावर भाजपचेच वर्चस्व होते
  • ‘मविआ’च्या भक्कम एकजुटीपुढे भाजपच्या हेमंत रासने यांचा निभाव लागला नाही
  • भाजपचा हा पराभव सामान्य नाही
मुंबई: आगामी महानगरपालिका आणि २०२४च्या विधानसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये तथाकथित महाशक्तीला पराभूत कसे करावे, याचा उत्तम वस्तूपाठ कसब्यातील निकालाने घालून दिला आहे. एकास एक उमेदवार दिला तर भाजपचा पराभव करणे सहज शक्य आहे. आपल्यात वजाबाकी होऊ न देणे आणि मतांची बेरीज वाढवणे हाच भाजपच्या पराभवाचा एकमेव कानमंत्र आहे. कसब्याचा निकालाचा हाच खरा अर्थ आहे, असे मत ‘सामना’च्या अग्रलेखातून मांडण्यात आले आहे.

कसब्यात मविआच्या रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासने यांचा दारुण पराभव केला. १९९५ पासून आजतागयात सलग २८ वर्षे या मतदारसंघावर भाजपचेच वर्चस्व होते. आधी गिरीश बापट नंतर मुक्ता टिळक येथून निवडून गेल्या. भाजपच्या आजवरच्या कसब्यातील विजयात त्यावेळी युतीमध्ये असलेल्या ओरिजिनल शिवसेनेचे योगदानही तेवढेच महत्त्वपूर्ण होते. शिवसैनिकांनी त्यावेळी प्रयत्नांची पराकाष्ठा केली नसती तर भाजपचा हा कपोकल्पित गड कधीच धराशायी झाला असता. असो, आता डुप्लिकेट शिवसेनेच्या साथीने भाजप पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरला आणि तोंडावर आपटला, अशी टीका ‘सामना’तून करण्यात आली आहे.
कसब्यातील पराभवानंतर भाजपमध्ये भूकंप; पदाधिकाऱ्यांना नेतृत्वाच्या रोषाचा सामना करावा लागणार?

कसब्यातील निकाला अर्थ काय?

रवींद्र धंगेकर हे काँग्रेसचे उमेदवार असले तरी महाआघाडीतील शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस या घटकपक्षांच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी या पोटनिवडणुकीत भाजपला धडा शिकवण्यासाठी जिवाचे रान केले व ‘मविआ’च्या भक्कम एकजुटीपुढे भाजपच्या हेमंत रासने यांचा निभाव लागला नाही. जवळपास ११ हजार मतांनी त्यांचा पराभव झाला कसब्यातील भाजपचा हा पराभव केवळ कसब्यापुरताच मर्यादित नाही तर या निकालाने संपूर्ण महाराष्ट्रालाच भाजपचा भ्रमाचा भोपळा कसा फोडायचा याचा उत्तम संदेश दिला आहे.
हा फडणवीसांचा मोठा पराभव! पुणे, पायगुण, मटण, दारु, वरळी; अभिजीत बिचुकलेंनी सगळंच काढलं
भाजपचा हा पराभव सामान्य नाही, बेइमानी करून व सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून राज्यात घडवलेला सत्ताबदल जनतेच्या किती डोक्यात गेला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील मराठी जनमानस किती प्रक्षुब्ध झाले आहे, याचा अंदाज भाजपच्या नेतृत्वाला आधीच आला होता. तरीही नसलेल्या बेटकुळ्या फुगवून ‘हा आमचा पारंपरिक बालेकिल्ला आहे,’ अशा फुशारक्या भाजप नेते एकीकडे मारत होते आणि दुसरीकडे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह राज्याचे अख्खे मंत्रिमंडळ प्रचारासाठी कसब्यात तळ ठोकून होते. मुख्यमंत्र्यांसह मिंधे मंडळाचा रोड शो झाला व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेदेखील निवडणुकीदरम्यान पुण्यात येऊन गेले. पण त्याचा पेठांतील मतदारांवर काडीमात्र परिणाम झाला नाही. पराभव समोर दिसू लागला तसा धनशक्ती’चे ब्रह्मास्त्रही ‘महाशक्ती’ ने वापरून पाहिले. तरीही शेवटी भ्रमाचा भोपळा फुटायचा तो फुटलाचा राजकारणातील नीतिमत्ता विकून खाणाऱ्या सत्ताधाऱ्यांना शनिवार पेठ,नारायण पेठ आणि रविवार व शुक्रवार पेठेतील जनतेनेच मोठी अद्दल घडवली, असे ‘सामना’त म्हटले आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here