बाजाराच्या सुरुवातीला मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) ३० शेअर्सचा सेन्सेक्स ४५० हून अधिक अंकांनी वाढून ५९ हजार ४०० अंकांच्या जवळ पोहोचला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनसीई) निफ्टीने सुमारे ११५ अंकांची उसळी घेऊन १७,४७५ अंकांचा टप्पा ओलांडला. दुसरीकडे, महिन्याभराच्या घसरणीनंतर आज अदानी समूहाच्या शेअर्समध्ये बंपर तेजीने कामकाज होत आहे. अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स, एसबीआय, रिलायन्स आणि टाटा स्टील हे निफ्टी टॉप गेनर्समध्ये ठरले.
अदानी शेअर्सची उसळी
शुक्रवारी बाजाराच्या सुरुवातीच्या सत्रात अदानी समूहाची प्रमुख कंपनी, अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्सनी ८ टक्क्यांहून अधिक उसळी घेतली. तर अदानी पॉवर आणि अदानी ग्रीन प्रत्येकी ५-५ टक्क्यांनी वधारले. अदानी पोर्टवरही ५ टक्के अप्पर सर्किट लागले. अदानी विल्मारही अपर सर्किटवर होता. अदानी ट्रान्समिशनही पाच टक्क्यांनी वाढले. याशिवाय अदानी गॅस, एसीसी, अंबुजा सिमेंट आणि एनडीटीव्ही देखील आज वाढीने काम करताना दिसत आहेत.
सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्सची स्थिती
सेन्सेक्सच्या सुरुवातीबद्दल बोलायचे तर अल्ट्राटेक सिमेंट आणि एशियन पेंट्स वगळता उर्वरित २८ समभाग उसळी घेताना दिसले. एसबीआयचा स्टॉक सर्वाधिक ३.३१ टक्के वाढला तर पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन आणि इंडसइंड बँकेत सुमारे २-२ टक्के वाढीसह व्यवहार करताना दिसत आहे. याशिवाय एनटीपीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, भारती एअरटेल, ITC, HCL टेक, एल अँड टी, टाटा स्टील, महिंद्रा अँड महिंद्रा आणि टाटा मोटर्स सारखे शेअर्स देखील १-१ टक्क्यांनी नफा कमाई करत आहेत.