मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर शुक्रवारी सकाळी शिवाजी पार्क परिसरात मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना हल्ला झाला. या हल्ल्यात संदीप देशपांडे यांच्या हात आणि पायाला दुखापत झाली आहे. संदीप देशपांडे यांच्यावर सध्या हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. डॉक्टरांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले आहेत. त्यांना मारहाणीत गंभीर दुखापत झाली आहे का, हे तपासण्यासाठी त्यांचा एक्स-रे काढण्यात आला आहे. सध्या संदीप देशपांडे यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, देशपांडे यांच्यावरील हल्ल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. यानंतर संदीप देशपांडे यांना भेटण्यासाठी मनसेचे नेते आणि कार्यकर्त्यांनी हिंदुजा रुग्णालयात मोठी गर्दी केली. मनसेप्रमुख राज ठाकरे आणि अमित ठाकरे हे दोघेही काहीवेळापूर्वीच हिंदुजा रुग्णालयात पोहोचले आहेत. मनसेचे नेते नितीन सरदेसाई आणि अन्य कार्यकर्ते सकाळपासूनच याठिकाणी आहेत. तर भाजप आमदार नितेश राणे हेदेखील हिंदुजा रुग्णालयात पोहोचले आहेत.

संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्यानंतर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. देशपांडे यांच्यावरील हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून संदीप देशपांडे सातत्याने मुंबई महानगरपालिकेतील घोटाळ्यांबद्दल बोलत आहेत. याच कारणामुळे त्यांच्यावर हल्ला झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
Sandeep Deshpande: मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर टोळक्याचा स्टम्प आणि रॉडने हल्ला

राज ठाकरेंच्या घरापासून काही अंतरावरच हल्ला

मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे शिवतीर्थ निवासस्थानही शिवाजी पार्क परिसरात आहे. संदीप देशपांडे हेदेखील शिवाजी पार्कमध्येच वास्तव्याला आहेत. आज सकाळी ते नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला पार्कात आले होते. त्यावेळी याठिकाणी दबा धरून बसलेल्या टोळक्याने स्टम्पच्या साहाय्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. हल्लेखोरांनी संदीप देशपांडे यांच्यावर मागून हल्ला केला. हल्लेखोर देशपांडे यांच्या डोक्यात स्टम्प घालणार होते. मात्र, संदीप देशपांडे यांनी स्टम्पचा फटका हाताने अडवला. या झटापटीत त्यांच्या पायालाही दुखापत झाली.

मात्र, डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करुन संदीप देशपांडे यांना डिस्चार्ज दिला आहे. संदीप देशपांडे हे व्हीलचेअरवर बसून रुग्णालयाबाहेर आले. त्यानंतर राज ठाकरे यांच्या ताफ्यातील गाडीत बसून ते घराकडे रवाना झाले. संदीप देशपांडे रुग्णालयातून निघेपर्यंत राज ठाकरे आणि अमित ठाकरे हिंदुजा रुग्णालयात थांबून होते. देशपांडे यांच्यावरील हल्ल्यानंतर पोलीस प्रशासन काय कारवाई करणार, हे पाहावे लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here