Ravindra Dhangekar | तब्बल २८ वर्षांनी काँग्रेसने कसब्यात विजय मिळवला आहे. या विजयानंतर रवींद्र धंगेकर यांनी राजकीय उमदेपणा दाखवत सर्वांचीच मनं जिंकून घेतली आहेत. ते टिळक आणि बापट कुटुंबियांच्या भेटीला गेले होते.

हायलाइट्स:
- कसब्यात भाजपचा दारुण पराभव
- रवींद्र धंगेकरांचा ऐतिहासिक विजय
- कसब्याचा नवा चेहरा रवींद्र धंगेकर
कसबा पोटनिवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला होता. अधिकृतरित्या निकाल जाहीर झाल्यानंतर रवींद्र धंगेकर हे गुरुवारी रात्री केसरीवाड्यावर गेले होते. याठिकाणी रवींद्र धंगेकर यांनी टिळक कुटुंबीयांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी शैलेश टिळक, कुणाल टिळक यांच्याशी गप्पाही मारल्या. त्यानंतर शुक्रवारी सकाळी रवींद्र धंगेकर हे गिरीश बापट यांच्या घरी पोहोचले. याठिकाणी त्यांनी गिरीश बापट यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. दोन्ही नेत्यांनी काहीवेळ गप्पा मारल्या. रवींद्र धंगेकर यांच्या या कृतीची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. एरवी अटीतटीच्या लढतीनंतर राजकीय उमेदवारांमध्ये कटुता निर्माण होते. मात्र, रवींद्र धंगेकर यांनी आपल्या कृतीने सर्वांची मनं जिंकून घेतली आहेत.
धंगेकराचं गिरीश बापटांच्या पावलावर पाऊल?
गिरीश बापट हे पाचवेळा कसब्यातून विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे कसबा पेठ मतदारसंघ म्हणजे गिरीश बापट अशी ओळखच तयार झाली होती. गिरीश बापट यांच्या दबदब्यामुळेच कसबा मतदारसंघ अनेक वर्षे भाजपकडे राहिला होता. या काळात गिरीश बापट यांनी कायम सर्वसमावेशक राजकारण केले. गिरीश बापट हे सर्वपक्षीयांसोबत सौहार्दाचे संबंध राखून होते. याच सर्वसमावेश राजकारणाच्या जोरावर गिरीश बापट २५ वर्षे कसब्याच्या राजकारणावर पक्की मांड ठोकून बसले होते. मात्र, अलीकडच्या काळात आजारपणामुळे गिरीश बापट हे राजकारणापासून दूर आहेत. त्यांनी एका मेळाव्याचा अपवाद वगळता कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारातही भाग घेतला नव्हता. त्यामुळे कसब्यात गिरीश बापटांचा उत्तराधिकारी कोण, अशी चर्चा रंगली होती. रवींद्र धंगेकर यांनी आपल्या दोन कृतींमधून सर्वसमावेशक राजकारण करत एकप्रकारे गिरीश बापटांच्या पावलावर पाऊल टाकले आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.