हिडेनबर्गच्या नकारात्मक अहवालानंतर अदानी शेअर्समध्ये जोरदार पडझड झाली ज्यामुळे गौतम अदानी यांची एकूण नेटवर्थ ३१ अब्ज डॉलरवर घसरली आणि एकावेळी जगातील तिसरे अतिश्रीमंत अदानी श्रीमंतांच्या टॉप-३० यादीतूनही बाहेर फेकले गेले.
गौतम अदानी पुन्हा अव्वल
अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांचा विश्वास परत येत असताना याचा प्रभाव गौतम अदानी यांच्या संपत्तीवरही दिसत आहे. बाजाराच्या शेवटच्या दिवसाच्या बाजार सत्रात म्हणजे शुक्रवारी गौतम अदानी फोर्ब्सच्या रिअल टाइम अब्जाधीशांच्या निर्देशांकात सर्वाधिक संपत्ती कमावणाऱ्यांच्या यादीत अव्वल ठरले. विशेष म्हणजे यापूर्वी २ मार्च रोजी देखील अदानी टॉप गेनर ठरले होते. तर आज त्यांनी बाजाराच्या सुरुवातीला फक्त दोन तासांत $४.८ अब्ज म्हणजेच सुमारे ३,९४,७६,४०,००,०० रुपये कमावले आहेत.
श्रीमंतांच्या यादीत अदानींची आगेकूच
शेअर्समधील सकारात्मक वाढीमुळे अदानी आता जगातील श्रीमंतांच्या यादीतही वरच्या दिशेने वाटचाल करत आहेत. गौतम अदानी केवळ तीन दिवसात त्यांनी ३७व्या क्रमांकावरून २६व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. त्यांनी तीन व्यापार दिवसात सुमारे $११ अब्जची कमाई केली असून त्यांना आपले जुने स्थान मिळवण्यासाठी आणखी दीर्घ कालावधी लागेल. दुसरीकडे, अदानींच्या शेअर्समधील तेजीमुळे कंपनीचे मार्केट कॅपही एका दिवसात १ लाख कोटींवर झेपावले आहेत. अलीकडेच अमेरिकन कंपनी GQG पार्टनर्सने अदानी ग्रुपच्या चार कंपन्यांचे १७ कोटीहून अधिक शेअर्स खरेदी केले असून यासाठी कंपनीने १५ हजार ४४९ कोटी रुपयांची गुंतवणूक केली, ही बातमी समोर आल्यावर अदानींच्या शेअर्सनी तेजीने व्यवहारास सुरुवात केली.