मुंबई : कल्याण-डोंबिवली, ठाणे, पालघर, नालासोपारा या ठिकाणी सहजपणे खाटा उपलब्ध होत नसल्याने मुंबईतील करोना रुग्णालयांमध्ये दाखल होण्यासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढती आहे. त्यासोबतच या रुग्णांना रुग्णालयांमध्ये खाटा मिळवून देतो, असे आश्वासन देऊन त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या दलालांच्या तक्रारी वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर करोना उपचारासाठी असलेल्या रुग्णालयांमध्ये रुग्णाला दाखल करताना या संपूर्ण प्रक्रियेमध्ये पारदर्शीपणा राहावा यासाठी ‘ट्रान्सफर हिस्ट्री’ असायलाच हवी, असे कडक निर्देश पालिका प्रशासनाकडून रुग्णालयांना देण्यात आले आहेत.

पालिकेतल्या एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात किंवा खासगी रुग्णालयातून पालिका रुग्णालयामध्ये रुग्णाला पाठवायचे असेल तरीही ही प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. त्यामुळे रुग्ण दाखल करताना कुणाच्याही दबावामुळे, ओळखीमुळे किंवा रुग्णाच्या नातेवाईकांना वाटते म्हणून करोनाबाधिताला एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याखेरीज नेता येणार नाही. या दोन्ही रुग्णालयांतील डॉक्टरांनी एकमेकांशी संवाद साधल्यानंतर रुग्णहिताच्या दृष्टीने निर्णय घेता येणार आहे. यासाठी प्रभाग कार्यालयामध्ये सुरू केलेल्या नियंत्रण कक्षालाही याबाबत विस्तृत माहिती द्यायची आहे.

करोनाचा संसर्ग मुंबईमध्ये नियंत्रणात आल्यानंतर ठाणे, कल्याण-डोंबिवली, नालासोपारा, पालघर या ठिकाणी हे प्रमाण वाढू लागले आहे. मुंबईमध्ये सद्यरुग्णांचे प्रमाण २० हजार १५८ असताना शुक्रवारी सकाळी १०पर्यंत ठाण्यात ३१ हजार ९२३ रुग्णसंख्या नोंदवण्यात आली. पालघरमध्ये ही रुग्णसंख्या पाच हजार ८०१, तर रायगडमध्ये पाच हजार १४२ झाली आहे. यातील असंख्य रुग्णांना मुंबईतील करोना रुग्णालयामध्ये दाखल करण्यासाठी राजकीय, प्रशासकीय तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सातत्याने येणाऱ्या दूरध्वनींचे प्रमाण वाढत आहे. सेव्हनहिल रुग्णालयामध्येच प्रवेश हवा असल्यासाठीही सातत्याने विचारणा होते. करोनामुळे रुग्णांची वैद्यकीय स्थिती चांगली नसेल तर रुग्णालयांमध्ये खाट मिळेल की नाही, या तणावामध्ये असलेल्या कुटुंबीयांच्या ताणाचा गैरफायदा घेऊन दलालांची साखळी कार्यान्वित असल्याची शक्यता वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

नियंत्रण कक्ष स्थापणार

मुंबईबाहेरून येणाऱ्या रुग्णांसाठी पालिका रुग्णालयांमध्ये प्रवेश कधीच नाकारण्यात आलेला नाही. मात्र यासाठी एक केंद्रीय नियंत्रण कक्ष स्थापन करून त्या माध्यमातून रुग्णालयामध्ये रुग्णांना दाखल करून घेण्यात यावे, असे संबंधित प्रशासनाला सूचवल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी ‘मटा’ला सांगितले.

गंभीर रुग्णांना प्राधान्य हवे

मुंबईबाहेरील काही ठरावीक पट्ट्यांतून येणाऱ्या रुग्णांना पालिका रुग्णालयामध्ये दाखल करण्यात येण्याच्या प्रमाणात अचानक मोठी वाढ झाली आहे. हे रुग्ण डॉक्टरी सल्ल्याने आले नसल्याचेही दिसून आले आहे. गंभीर अवस्थेमध्ये असलेल्या रुग्णांना तातडीचे उपचार देण्यास प्राधान्य आहे. मात्र केवळ पॉझिटिव्ह आहेत, मात्र लक्षणे नाहीत अशा रुग्णांसाठी मुंबईतल्या रुग्णालयांचा आग्रह कशासाठी केला जातो, याचाही सखोल तपास झालेल्या नोंदीवरून करण्यात येत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here