संशयित आरोपी संजय हा पनवेल रेल्वे स्थानकात व्यवसाय करत होता. संजय भालेराव हा आपल्या पत्नी पूजा वरती कायम संशय घेत होता. तिचे कोणत्यातरी परपुरुषाजवळ अनैतिक संबंध असल्याचा पती संजय याचा संशय होता. याच संशयाच्या प्रकरणावरून पत्नी पूजा व पती संजय यांच्यात वारंवार भांडण होत असत. अखेर या सगळ्या घडलेल्या प्रकाराला कंटाळून पत्नी पूजा हिने कर्जत पोलीस ठाण्यात दोन मार्च रोजी संजयच्या विरोधात तक्रार दाखल केली. पूजा आपल्या मोठ्या मुलीला संजयच्या घरी ठेवून इतर तीन मुलांसह वांगणी येथे आपल्या माहेरी निघून गेली होती.
दरम्यान, मोठ्या मुलीनेही आईला फोन करून आपल्यालाही मामाच्या घरी घेऊन जा, अशी विनंती करत संजयच्या हळवली येथील घरी बोलावले. पूजा हळवली येथे आल्यावर संजय सोबत पुन्हा वाद निर्माण झाले. याचवेळी संजयने आपल्या मोठ्या मुलीला बाथरूम मध्ये बाहेरून कडी लावून बंद केले, तर पूजाला बेडरूम मध्ये नेऊन तिच्या पोटावरती धारदार कात्रीने वार केले. त्यानंतर धारदार कात्री पोटात घुसवून त्याने जवळ असलेली शिलाईची मशीनच पूजाच्या डोक्यात घातली. तिच्या पाठीवरही कात्रीने वार केले व अत्यंत निर्दयीपणे पत्नी पूजा हिची पती संजय याने हत्या केली.
याच दरम्यान पूजा हिची आई संजयच्या घरी पोहोचली. आपल्या मुलीला रक्ताच्या थारोळ्यात पाहून आईच्या पायाखालची जमीनच सरकली. यावेळी सासूला धक्का देत संजय घटनास्थळावरून पळून गेला. या सगळ्या घटनेची माहिती कर्जत पोलिसांना मिळताच कर्जतचे पोलीस उपविभागीय अधिकारी विजय लगारे यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी तात्काळ दाखल झाले व त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. मात्र पळून गेलेला नराधम पती संजय हा काही वेळातच कर्जत पोलिसांसमोर पोलीस स्थानकात हजर झाला व त्याने पत्नी पूजा हिचा खून केल्याची कबुली दिली.
या सगळ्या धक्कादायक खून प्रकरणाचा तपास कर्जत पोलीस उपविभागीय अधिकारी विजय लगारे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर व उपनिरीक्षक उद्धव सुर्वे करत आहेत. पूजाच्या माहेरच्या मंडळींनी नराधम पती संजय याला कठोरात कठोर कायदेशीर शिक्षा करावी अशी मागणी कर्जत पोलिसांकडे केली आहे. २ मार्च रोजी गुरुवारी कर्जत पोलीस ठाण्यात पती संजय भालेराव विरोधात तक्रार दाखल केली होती आणि अवघ्या दुसऱ्याच दिवशी ३ मार्च रोजी शुक्रवारी हे हत्याकांड घडल्याने अवघा कर्जत तालुका हादरला आहे. या सगळ्याचा अधिक तपास कर्जत पोलीस करत आहेत.
संजय राऊतांनी खूप बकबक केली आता थांबावं; दीपाली सय्यद यांचा खोचक सल्ला