अदानी समूहातील कंपन्यांच्या तेजीने एलआयसीच्या गुंतवणुकीचे मूल्यही एका झटक्यात वाढले आहे. जानेवारीच्या अखेरीस एलआयसीने अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये ३० हजार १२७ कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याची माहिती देण्यात आली होती. तर २४ जानेवारीपर्यंत आयुर्विमा महामंडळाची अदानींच्या कंपन्यांमधील गुंतवणूक ८१,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त होती. पण हिंडेनबर्ग अहवालामुळे अदानी समूहाचे शेअर्स मोठ्या प्रमाणात कोसळले परिणामी कंपन्यांमधील एलआयसीच्या गुंतवणुकीचे मूल्य लक्षणीयरीत्या गडगडले. पण गेल्या ४ दिवसांत अदानींच्या शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे एलआयसीच्या गुंतवणुकीचे मूल्य आता ३९,००० कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
शेअर बाजारातील आकडेवारीनुसार शुक्रवारी मार्केट क्लोज झाले तेव्हा एलआयसीच्या गुंतवणुकीचे मूल्य ३९,०६८.३४ कोटी रुपये झाले आहे. अशा प्रकारे एलआयसीला सुमारे ९,००० कोटी रुपयांचा नफा झाला आहे. अदानी समूहाच्या समभागांच्या घसरणीने एलआयसीच्या गुंतवणुकीच्या निर्णयावर काही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.
एलआयसीची अदानी समूहात गुंतवणूक
बाजारात अदानी समूहाच्या १० पैकी सात सूचीबद्ध कंपन्यांमध्ये एलआयसीने पैसा गुंतवला आहे. यामध्ये अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स, अदानी टोटल गॅस, अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन एनर्जी, एससीसी आणि अंबुजा सिमेंट या कंपन्यांचा समावेश आहे. अशा प्रकारे, डिसेंबर तिमाही शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार या कंपन्यांमधील एलआयसीच्या गुंतवणुकीचे मूल्य आता ३९ हजार कोटींवर पोहोचले असून एलआयसीने डिसेंबरपासून अदानी समूहाचे शेअर्स खरेदी केले की विकले, याबाबत अद्याप कोणतेही स्पष्टीकरण मिळालेले नाही.