‘आज या सोहळ्यात इतकी दिग्गज मंडळी व तारे-तारका उपस्थित आहेत. पण, सगळा शो इथून ज्यांनी पळवून नेला आहे, अशा आजच्या रॉकस्टार कोण असतील तर त्या आहेत वसुंधरा साथी पुरस्कार पटकावणाऱ्या स्वच्छ संस्थेच्या त्या स्वच्छतादूत’, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात स्वच्छतादूतांचा गौरव केला.
‘कष्ट करून संध्याकाळी तुमच्याच मालिका पाहतो’
मंगला जाधव या कचरा वेचण्याचं काम करतात. मटा सन्मान सोहळ्याला अनेक कलाकार उपस्थित होते. यावेळी मंगळा यांनी सांगितलं, की ‘आम्ही दिवसभर कचरा वेचतो, काबाडकष्ट करतो आणि संध्याकाळी तुमच्याच मालिका पाहतो. मी सारखे सिद्धार्थ दादाकडे पाहतेय. माझ्या आवडत्या निवेदिता जोशी-सराफही इथे आहेत’, अशा आपल्या उत्स्फूर्त भावना मंगल जाधव यांनी व्यासपीठावरून व्यक्त करताच चित्रपटसृष्टीतील तारे-तारकांनी खच्चून भरलेले संपूर्ण सभागृह हास्यात बुडाले.
पीएनजी ज्वेलर्स प्रस्तुत ‘मटा सन्मान २०२३’ पॉवर्ड बाय सारस्वत बँक, को-पॉवर्ड बाय जी एच रायसोनी युनिव्हर्सिटी अमरावती, एन्व्हायर्नमेंट पार्टनर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ हा सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या कार्यक्रमात मंगला जाधव यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.