न्यूयॉर्क पोस्टनं दिलेल्या वृत्तानुसार, चीनच्या युन्नान प्रांतातील एका गावात वास्तव्यास असलेल्या सू युन यांनी २०१६ मधील सुट्ट्यांमध्ये तिबेटी मास्टिफ पिल्लू समजून एक प्राणी खरेदी केला. दोन वर्षात पिल्लू बरंच मोठं झालं. त्याचं वजन २५० पाऊंड म्हणजेच जवळपास ११४ किलोग्रॅमपर्यंत पोहोचलं. आपण कुत्रा पाळला असल्याचा सू युन यांचा समज होता. मात्र सू युन यांना त्यांनी पाळलेला प्राणी अनेकदा दोन पायांवर चालताना दिसला. त्यामुळे कुटुंबाला शंका आली. त्यांनी प्राण्याबद्दल अधिक माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांना आपण पाळलेला प्राणी आशियाई अस्वल असून तो नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचं समजलं.
सू युन त्यांनी पाळलेल्या ‘कुत्र्याची’ भूक पाहून चिंतेत होत्या. सर्वसामान्य कुत्र्यांपेक्षा त्याची भूक अधिक होती. अधिक खात असल्यानं त्याचं वजन वाढत गेलं. त्यामुळे सू युन यांना शंका आली. सू युन अधिकाऱ्यांकडे पोहोचल्या. त्यांनी प्राण्याची माहिती अधिकाऱ्यांना दिली. तुम्ही कुत्रा नव्हे, आशियाई अस्वल पाळला असल्याचं अधिकाऱ्यांनी युन यांना सांगितलं. ते ऐकून त्यांना धक्काच बसला.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अस्वलाचं वजन ४०० पाऊंड म्हणजेच जवळपास १८२ किलोग्रॅमहून अधिक होतं. युन यांनी पाळलेलं अस्वल पाहून अधिकारी घाबरले. या अस्वलाला आता युन्नान वन्यप्राणी बचाव केंद्रात नेण्यात आलं आहे. तिथे त्याची देखरेख केली जात आहे.