कोल्हापूर : पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत विजय मिळवला. रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना धूळ चारत भाजपची चांगलीच कोंडी केली. या पराभवानंतर महाविकास आघाडीकडून भाजप नेत्यांवर जोरदार टीका होत आहे. अशातच भाजप नेते आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रचारादरम्यान केलेल्या ‘हू इज धंगेकर’ या वक्तव्याचा व्हिडिओही सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होत आहे. याबाबतचे बॅनरही संपूर्ण पुण्यात झळकत असून असाच एक बॅनर आता चंद्रकांत पाटील यांचं होम ग्राउंड असणाऱ्या कोल्हापूरमध्ये देखील झळकला आहे. कोल्हापुरातील कावळा नाका येथील ताराराणी चौकात ‘दिस इज धंगेकर’ असं लिहिलेले पोस्टर लावण्यात आले असून या माध्यमातून चंद्रकांत पाटील यांना डिवचण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जात आहे.

कोल्हापुरातील ताराराणी चौकात हा पोस्टर लावण्यात आला असून महाविकास आघाडीच्या वतीने येथे जल्लोष देखील करण्यात आला. तसंच यावेळी पुण्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर कार्यकर्त्यांनी जोरदार टीका केली आहे. ‘स्वतःला गिरणी कामगारांचा मुलगा म्हणून घेता आणि दुसऱ्याला इतकं कमी लेखता. यामुळेच आम्ही हा पोस्टर येथे लावला आहे आणि २०२४ सालच्या निवडणुकीत देखील तुम्हाला कसब्यात जे घडलं त्याचीच पुनरावृत्ती दिसेल,’ असं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावेळी म्हटलं आहे. तसंच काल संजय राऊत यांनी देखील यापुढे भाजपचे सर्व बालेकिल्ले असेच उद्ध्वस्त करू, असं म्हणत पुण्याची हवा आता बदलली आहे. यामुळे चंद्रकांतदादा आता तुम्ही कोथरूडमधून निवडणूक लढणार का, असा खोचक सवालही राऊत यांनी यावेळी विचारला होता.

फडणवीसांचं राजकारण दुश्मनीचं, कधीतरी अंत होणार, कुणी नमस्कारही करणार नाही : रवींद्र धंगेकर

दरम्यान, कसब्याची पोटनिवडणूक ही भाजप आणि महाविकास आघाडीसाठी मोठी प्रतिष्ठेची मांडली जात होती. यामुळे भाजप आणि शिंदे गटाकडून येथे आक्रमक प्रचारही करण्यात आला. भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री सुद्धा पुण्यात दाखल झाले होते, तसंच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तर तळ ठोकून होते. जागोजागी कॉर्नर सभा आणि शक्तिप्रदर्शन करत रॅली काढण्यात आली. अशाच एका सभेत चंद्रकांत पाटलांनी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना उद्देशून ‘हू इज धंगेकर, ते आमच्यासमोर टिकू शकत नाहीत,’ असे म्हटलं होतं. या पार्श्वभूमीवर आता धंगेकर यांच्या विजयानंतर चंद्रकांत पाटलांना ट्रोल केलं जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here