aurangabad accident news, समृद्धी महामार्गावर ट्रक पुलावरून कोसळला; काही सेकंदात पेट घेतला अन् दोघांचा होरपळून मृत्यू – truck falls off bridge on samriddhi highway caught fire in a few seconds and driver cleaner passed away
छ्त्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावरून शिर्डी येथून रायपूरला केमिकल घेऊन जाणाऱ्या मालवाहू ट्रकला भीषण अपघात झाला आहे. चालकाला अंदाज न आल्याने ट्रक पुलावरील कठडा तोडून खाली कोसळला. या दुर्घटनेनंतर ट्रकला आग लागल्याने चालक आणि क्लिनरचा आगीत होरपळून मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना वेरूळ इंटरचेंजच्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या गोकुलवाडी येथे शुक्रवारी मध्यरात्री घडली. सोहेल खान (वय-३२ वर्ष, रा.भिलाई दुरगुड) असं चालकाचे नाव आहे, तर नौशाद (वय- २४, वर्ष, रा. भिलाई दुरगुड) असं क्लिनरचं नाव आहे.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, मालवाहू ट्रक (क्रमांक- सी.जी. ०७, ए.डब्ल्यू. ०५१८) यामध्ये केमिकल बॅरेल घेऊन चालक सोहेल आणि क्लिनर नौशाद हे दोघेही मुंबई येथून रायपूरकडे निघाले होते. दरम्यान शिर्डी येथून त्यांनी समृद्धी महामार्गाचा वापर केला. शुक्रवारी रात्री सुमारे रात्री ११च्या वाजेच्या सुमारास ट्रक छ्त्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ इंटरचेंजच्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या गोकुलवांडी येथे आले असता जवळील पुलावर अंदाज न आल्याने ट्रक कठडा तोडून पुलावरील दोन्ही बाजूच्या रस्त्याच्या मध्ये असलेल्या भागातून खाली कोसळला. शेतात मका जोमानं उभा, पण आत भलताच उद्योग चाललेला; पोलिसांना टिप मिळाली, छापा टाकला अन्…
पुलावरून कोसळल्यानंतर काही सेकंदातच ट्रकला भीषण आग लागली, अशी माहिती ग्रामस्थांकडून देण्यात आली. मोठा आवाज झाल्यानंतर आगीचे लोळ आकाशात दिसू लागल्याने आजूबाजूच्या ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि सुरक्षा यंत्रणा व पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केले. अथक परिश्रमानंतर जवानांनी आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
दरम्यान, आगीचा भडका एवढा मोठा होता की काही वेळातच ट्रक जळून खाक झाला तर चालक आणि क्लिनरचाही आगीत होरपळून मृत्यू झाला.