Edited by रोहित धामणस्कर | | Updated: 5 Mar 2023, 8:28 am

bullock cart race in Satara | साताऱ्यात उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. शर्यतीचे सात फेरे पूर्ण झाल्यावर आठव्या फेरीसाठी सात बैलगाड्या एके ठिकाणी उभ्या होत्या.

 

Bullock car race
बैलगाडा कृष्णा नदीत कोसळला

हायलाइट्स:

  • दोन बैलांचा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू
  • दोन्ही बैल गाडीला जुंपलेले असल्यामुळे बुडाले
सातारा: शर्यत सुरू असतानाच बैलगाडीने चाकोरी सोडल्याने थेट कृष्णा नदीपात्रात बैलगाडा गेल्याने दोन बैलांचा बुडून जागीच मृत्यू झाला. यामध्ये बैलगाडा चालकाने वेळीच उडी टाकल्याने तो बचावला. सध्या राज्यात अनेक ठिकाणी बैलगाडा शर्यतींचे आयोजन केले जात आहेत. मात्र, शर्यतीदरम्यान अनेक अपघाताच्या घटनाही घडत आहेत. नुकतेच बोरखळ येथील बैलगाडा स्पर्धेत तरुणाचा मृत्यू तर लोणंद येथील स्पर्धेदरम्यान बैलगाड्यावरून पडून एक तरुण जखमी झाला होता. अशीच घटना आज कोरेगाव तालुक्यातील तांदुळवाडी गावात घडली. या ठिकाणी आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीवेळी बैलगाडी कृष्ण नदीपात्रात पडल्याने दोन बैलांचा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर चालकाने बैलगाडीतून उडी मारल्याने तो बचावला. या घटनेनंतर शर्यती रद्द करण्यात आल्या.
VIDEO : भिर्रर्र होताच बैलगाडा उधळला, थेट घराच्या छतावर; पत्रा तोडून घरात अन् मग…
श्रीक्षेत्र कोल्हेश्वर देवस्थान आणि उदयनराजे मित्र समूहाच्या वतीने खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडी शर्यतींचे आयोजन केले होते. बैलगाड्यांची नोंदणी झाल्यानंतर सकाळी ११ च्या सुमारास शर्यती सुरू करण्यात आल्या. यावेळी कृष्णा नदीपात्रापासून सुमारे ६०० ते ७०० फूट अंतरावर उत्तर – दक्षिण (कोल्हेश्वर मंदिर) असे शर्यतीचे सात ट्रॅक उभारले होते. दुपारी दोनच्या सुमारास शर्यतीचे सात फेरे पूर्ण झाल्यावर आठव्या फेरीसाठी सात बैलगाड्या उत्तर दिशेकडे गेलेल्या होत्या. त्यानंतर झेंडा पडताच बैलगाड्या सुसाट धावू लागल्या. यावेळी सीमारेषेपासून सुमारे ८०० फूट अंतरावर गाड्या आलेल्या असताना शेवटच्या एका ट्रॅकमधील एक बैलगाडी आपला ट्रॅक सोडत उधळली व ती पूर्वेला असलेल्या कृष्णा नदीपात्राकडे धावली.
बैल अंगावर पडल्याने गुदमरला, मुक्या प्राण्यांना जीव लावणाऱ्या तरुणाची चटका लावणारी एक्झिट
यावेळी चालकाने बैलगाडी थांबवून दक्षिण व उत्तरे दिशेस वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, बैलगाडी नदीपात्राच्या दिशेने जाऊ लागल्याने चालकाने बैलगाडीतून उडी घेतली आणि बैलगाडी दोन्ही बैलांसह नदीत सुमारे ७५ फूट खोल कोसळली. त्यात दोन्ही बैल गाडीला जुंपलेले असल्यामुळे बुडाले. मदत मिळेपर्यंत दोन्ही बैल मृत्युमुखी पडले. मृत्यमुखी पडलेल्या दोन्ही बैलांपैकी एक बैल त्रिपुटी (ता. कोरेगाव) आणि दुसरा बैल मालगाव (ता. सातारा) येथील होते. या घटनेमुळे कोरेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कोरेगावच्या तहसीलदारांनी शंभर मीटर अंतरावर नदी असताना, नदी काठावर शर्यत घेण्यासाठी परवानगी दिलीच कशी? यामुळे कोरेगावच्या तहसीलदार आणि आयोजकावर कारवाई करण्याची मागणी प्राणीमित्रांकडून होऊ लागली आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here