ऑस्ट्रेलियानं भारतावर विजय मिळवत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे. तिसऱ्या कसोटीतील पराभवामुळं टीम इंडियाचं अंतिम फेरीत पोहोचण्याचं गणित अवघढ झालं आहे. भारताला आता कोणत्याही परिस्थितीत ऑस्ट्रेलियाला चौथ्या कसोटीत पराभूत करावं लागेल. चौथी कसोटी जिंकल्यास टीम इंडिया डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचू शकेल.
अहमदाबाद कसोटी अनिर्णित राहिल्यास काय
ऑस्ट्रेलियानं अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. चौथी कसोटी अनिर्णित राहिल्यास भारताचा मार्ग आणखी खडतर होऊ शकतो. श्रीलंकेनं न्यूझीलंड विरुद्ध २-० अशी कसोटी मालिका जिंकल्यास त्यांना अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी आहे.
मॅच अनिर्णित झाल्यास भारताचं भविष्य न्यूझीलंड श्रीलंकेच्या हाती
अहमदाबाद कसोटी भारतानं गमावल्यास किंवा अनिर्णित झाल्यास नवं समीकरण निर्माण होतं. टीम इंडियाला अंतिम फेरीत पोहोचायचं असल्यास न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्या मालिकेच्या निर्णयावर अवलंबून असेल. न्यूझीलंड आणि श्रीलंकेतील एक कसोटी अनिर्णित राहणं आवश्यक आहे. श्रीलंका- न्यूझीलंडमधील पहिली कसोटी ९ मार्चपासून सुरु होणार आहे.
ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत
इंदूर कसोटीतील विजयानंतर ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला तरी त्यांचं अंतिम फेरीतील स्थान निश्चित झालेलं आहे. गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया सध्या ६८.५२ गुणासंह पहिल्या स्थानी, भारत ६०.२९ गुणांसह दुसऱ्या स्थानी यानंतर अनुक्रमे श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेचा क्रमांक आहे. ७ जूनला ओव्हलवर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी होणार आहे.