Maharashtra Politics | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय पवार हे शनिवारी जळगावातील शिंदे गटाच्या कार्यक्रमात व्यासपीठावर दिसून आले. जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात.

हायलाइट्स:
- राष्ट्रवादीचा पुढारी शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या विकासकामाच्या सोहळ्यात व्यासपीठावर
- गुलाबराव पाटील आणि भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासोबत राष्ट्रवादीचे संजय पवार उपस्थित
- राष्ट्रवादीचे संजय पवार यांची मनोगतात भाजप आमदार व शिंदे गटाच्या मंत्र्यांवर स्तुतीसुमने
मात्र, जळगावात एकाच वेगळ्या राजकीय समीकरणाची पायाभरणी सुरु असल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत अशी ओळख असलेले संजय पवार हे शनिवारी शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे यावेळी भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांची उपस्थिती होती. संजय पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. तसेच ते जिल्हा दूध संघाचे तसेच जिल्हा बँकेचे संचालक सुद्धा आहेत. शिंदे गटाच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे संजय पवार हे मंत्री गुलाबराव पाटील व भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या सोबत एकच व्यासपीठावर दिसून आल्याने वेगवेगळ्या राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. संजय पवार यांनी मनोगत व्यक्त करताना मंत्री गुलाबराव पाटील व भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर चांगलीच स्तुतीसुमने उधळली.
जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी बोलून दाखवली इच्छा
हेच ते राष्ट्रवादीचे संजय पवार की ज्यांनी अजित पवार यांच्या फोननंतर सुद्धा जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत महविकास आघाडीची साथ सोडून शिंदे गट व भाजपच्या पॅनलला पाठिंबा देत निवडणूक जिंकली होती. आता जिह्यात सगळ्यात मोठी व जुनी समजली जाणारी, तसेच दगडी बँक म्हणून तिची ओळख आहे त्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. या जिल्हा बँकेवर अध्यक्ष होण्याबाबतही यावेळी राष्ट्रवादीचे संजय पवार यांनी मनोगत आधीच्या बोलून दाखवले. तसेच गुलाबराव पाटील यांनी ठरवले तर मी अध्यक्ष होऊ शकतो, तसेच त्यांनी नाही व्हायचं असं ठरवले तर मी नाही होऊ शकत नाही, अशी मिश्कील टिप्पणी यावेळी संजय पवार यांनी केली. दरम्यान मंत्री गुलाबराव पाटील यांनी कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना संजय पवार जिल्हा बँकेचे अध्यक्ष होतील, असे म्हटले. तर दुसरीकडे पत्रकारांशी बोलताना मात्र संजय पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्याने याबाबत त्यांचा पक्ष निर्णय घेईल अशी प्रतिक्रिया सुद्धा गुलाबराव पाटील यांनी दिली.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.