धुळे : जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील हातनूर गावात पिसाळलेल्या कुत्र्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. हातनूर गावातील तब्बल १२ जणांना एका पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला होता. यात १२ वर्षीय विराज सयाजी जगताप याच्या चेहऱ्यावर कुत्र्याने चावा घेतल्याने त्यात तो गंभीर जखमी झाला होता. गेल्या १२ दिवसांपूर्वी ही घटना घडली होती. जखमी विराजला धुळे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
बारा वर्षीय विराज हा घरातील एकुलता एक मुलगा होता. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे. ज्या १२ जणांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला होता त्यांच्या मनात मोठ्या प्रमाणात भीती निर्माण झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा विषय संपूर्ण जिल्ह्यात गंभीर झाला आहे. मात्र प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीए. यामुळे मोकाट कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.