त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तालुक्यातीलच आव्हाटे बरड्याचीवाडी येथील एक गरोदर महिला डिलिव्हरीसाठी दाखल झाली होती. यावेळी तिला जोरदार प्रसूती कळा सुरू झाल्या. त्यावेळी आरोग्य केंद्रात एकही आरोग्य कर्मचारी अधिकारी दाखल नसल्याचं सदर महिलेच्या आईकडून सांगितलं जात आहे. ज्यावेळी डिलिव्हरीसाठी मुलीला आरोग्य केंद्रात आणण्यात आले त्यावेळी दरवाजा देखील बंद होता. आम्ही दोन महिला मिळून मुलीची डिलिव्हरी केली. त्यावेळी रुग्णालयात सिस्टर-डॉक्टर कोणीही हजर नव्हतं, असं डिलिव्हरी झालेल्या महिलेच्या आईकडून सांगण्यात आले.
सुदैवानं गरोदर महिलेची डिलिव्हरी सुखरूप झाली आहे. या प्रकाराने नाशिक जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र असूनही आरोग्य कर्मचारी नसल्याने व उपचार आणि त्याचा लाभ मिळत नसल्याने बाळंतपण झालेल्या महिलेच्या नातेवाईकांसह नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
अनेक वेळा रुग्णवाहिका न मिळाल्याने तसेच वेळेत उपचार न मिळाल्याने रुग्णांना जीव गमवावा लागतो. देशाच्या स्वातंत्र्याचा आझादी का अमृत महोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा झालेला असला तरी स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षांनीही सामान्य जनतेला अजून मुलभूत सोयीसुविधांसाठी आणि आरोग्याच्या सुविधांसाठी झगडावं लागत आहे.