unfortunate death of 12th student, यशाचं शिखर गाठण्यापूर्वीच १२वीच्या विद्यार्थ्याचा नियतीनं घात केला, घटनेनं देवरे कुटुंबाला धक्का – unfortunate death of 12th student harish deore in surane village nashik
नाशिक : जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील सुराणे येथे बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आई-वडिलांच्या एकुलता एक मुलाचे निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी जायखेडा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
या बाबतची अधिक माहिती समोर आली आहे. हरीश सुधाकर देवरे (वय १९ वर्षे ) हा तरुण शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास शेततळ्याजवळ काम करत असताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो शेततळ्यात पडला. परंतु त्याला पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडाला आणि त्याचा मृत्यू झाला. ही घटना कुटुंबीय आणि आजूबाजूंच्या शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शेततळ्याकडे धाव घेतली. तरुणाला तात्काळ पाण्यातून बाहेर काढून नामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु यावेळी डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. दरम्यान, हरीश हा देवरे परिवारातील अतिशय मनमिळावू आणि प्रेमळ स्वभावाचा तरुण होता. आई-वडिलांचा हरीश हा एकुलता एक मुलगा होता. त्याची सध्या बारावीची परीक्षा सुरू होती. स्वप्न उराशी बाळगून परीक्षा देत होता. तसेच कुटुंबाला शेतीच्या कामात हातभारही लावत होता. परीक्षा देऊन यशाचे उंच शिखर गाठून कुटुंबाचे स्वप्न द्विगुणीत करणार होता. परंतु नियतीने घात केला. देवरे कुटुंबावर काळाचा घाला घातला आणि एकुलत्या एक मुलाचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.