त्रिपुरामधील आमदारांमधील गटबाजी मिटत नसल्यानं भाजपनं आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना त्रिपुराला पाठवलं आहे. मुख्यमंत्रिपदी कोणाला संधी द्यायची यावरुन निर्माण झालेला तिढा सोडवण्याची जबाबदारी सरमा यांच्यावर आहे.
काही आमदारांचा माणिक साहा यांच्या नावाला विरोध आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री प्रतिमा भौमिक यांनी देखील विधानसभा निवडणूक लढवत धानपूर मतदारसंघातून विजय मिळवला आहे. काही आमदारांची त्यांच्या नावाला पसंती आहे. त्यामुळं पक्षाचं नेतृत्त्व कुणाला संधी देणार याकडे लक्ष लागलं आहे.
आमदारांची बैठक होणार
भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांपैकी काही आमदारांचा माणिक साहा यांच्या नावाला पाठिंबा असून काही जणांचा प्रतिमा भौमिक यांच्या नावाला पाठिंबा आहे. साहा यांच्या समर्थनार्थ बिप्लब देब यांचे समर्थक देखील उतरले आहेत. भाजप आमदारांची लवकरच बैठक घेतली जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे.
केंद्रीय नेत्यांचा कौल साहा यांच्या बाजूनं
भाजपच्या सूत्रांच्या माहितीनुसार केंद्रीय नेतृत्त्व माणिक साहा यांच्या बाजूनं कौल देण्याची शक्यता आहे. माणिक साहा यांच्या एक वर्षाच्या कामगिरीचा लाभ त्यांना होऊ शकतो.
८ मार्चला शपथविधी
त्रिपुराच्या मुख्यमंत्री पदाचा शपथविधी ८ मार्चला होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. मोदींशिवाय अमित शाह, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा देखील उपस्थित राहतील. सध्यातरी प्रतिमा भौमिक आणि माणिक साहा यांच्या नावांची चर्चा आहे.
दरम्यान, माणिक साहा यांना मुख्यमंत्री पदावर संधी देत प्रतिमा भौमिक यांना उपमुख्यमंत्री केलं जाण्याची शक्यता आहे.
भाजपनं पैसे वाटून काही होणार नाही, कसब्यात विजय तर माझाच होणार; रविंद्र धंगेकरांना विश्वास