ऋषी साहू हा शहरातील कुख्यात वाहन चोर आहे. त्याचा भाऊ गोल्डी साहू हाही वाहन चोरीच्या गुन्ह्यात तुरुंगात शिक्षा भोगत आहे. पाचपावली पोलिसांनी वाहन चोरीच्या घटनेप्रकरणी नुकतीच गोल्डीला अटक केली होती.
कडबी चौकातील ज्योती सोसायटीतील तमन्ना थापर (वय ३२) यांनी गेल्या महिन्यात २१ फेब्रुवारीच्या रात्री अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये आपले वाहन उभे केले होते. मध्यरात्रीनंतर ऋषी आणि पायल यांनी मिळून त्यांचे वाहन चोरले. तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. ऋषी आणि पायल भिकाऱ्यांच्या वेशात परिसरात फिरताना पोलिसांना सीसीटीव्हीत दिसून आले. ऋषी सराईत गुन्हेगार असल्याने पोलिसांनी त्याला लागलीच ओळखले.
जरीपटका पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता ऋषीला अटक केली. त्याचवेळी त्याच्या सांगण्यावरून पायललाही पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी सीताबर्डी आणि जरीपटका पोलीस ठाण्यांतर्गत आणखी दोन वाहने चोरल्याची कबुली दिली आहे. आरोपींच्या सांगण्यावरून पोलिसांनी तिन्ही वाहने जप्त केली आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.