रत्नागिरी खेड : निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह आणि पक्षनाव एकनाथ शिंदे यांना बहाल केल्यानंतर उद्धव ठाकरे यांची पहिलीच जाहीर सभा रत्नागिरीतील खेडमध्ये पार पडली. हजारो शिवसैनिकांच्या साक्षीने उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ४० आमदारांवर शाब्दिक गोळीबार केला. ढेकणांना चिरडायला गोळीबाराची आवश्यकता नसते. मतदानादिवशी तुमचं एक बोट यांना चिरडून टाकेल, असं म्हणत अप्रत्यक्षरित्या शिंदेंच्या आमदारांना पराभूत करण्याचा मंत्रच उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिला. सभा कोकणात असल्याने उद्धव ठाकरे राणे-केसरकर-सामंत-रामदास कदम यांचा समाचार घेतील, अशी चर्चा होती. पण उद्धव ठाकरेंनी सगळ्यांना अनुल्लेखाने मारत फक्त मुख्यमंत्री शिंदेंनाच टार्गेट केलं. जवळपास ५० मिनिटांच्या भाषणात त्यांनी शिंदे आणि भाजपवर जोरदार हल्ले केले. उद्धव ठाकरेंचं भाषण ऐकून मंचावरील नेतेही स्तब्ध झाले. ठाकरेंनी उपस्थितांसमोर जय महाराष्ट्राची घोषणा देताच शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पुढे सरसावून पक्षप्रमुखांच्या भाषणाला दिलखुलास दाद दिली. संपूर्ण भाषणात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केलं. राज्यात झालेलं सत्तांतर, शिवसेना आमदारांनी घेतलेली ठाकरेंविरोधातील भूमिका, शिवसेनेवर सांगितलेला दावा, निवडणूक आयोगाचा निकाल, तुटलेल्या एसटीवर आणि फुटलेल्या काचांवर केलेली शासनाची जाहिरात अशा मुद्द्यांवरुन उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर आसूड ओढले. तसेच एकनाथ शिंदे यांना हाताला धरुन शिवसेना संपविण्याचा डाल भाजपने आखला असं सांगताना भाजपवरही उद्धव ठाकरेंनी शरसंधान साधलं. एकंदरित गोरेगावच्या नेस्को मैदानावर केलेल्या भाषणाचा पुढचा अंक म्हणजे आजचं भाषण तडाखेबंद होतं, अशी चर्चा खेडमधील उपस्थितीत शिवसैनिकांमध्ये होती.
उद्धव ठाकरे ५० मिनिटे एकनाथ शिंदेंवर बरसत होते. भाषणाच्या शेवटी वाणीला पूर्णविराम दिल्यानंतर उद्वव ठाकरे डायसवरुन बाजूला सरकताच त्यांच्या भाषणाचं कौतुक करायला सुषमा अंधारे पुढे सरसावल्या. अंधारे पुढे आलेल्या पाहून, कसं काय झालं भाषण? अशी विचारणा उद्धव ठाकरे यांनी केली. त्यावर ‘व्वा उद्धवसाहेब… भाषण खूपच जोरात झालं..’ असं हातानेच खुणावत अंधारेंनी पक्षप्रमुखांच्या भाषणाला दिलखुलास दाद दिली. यावेळी दोघांच्याही चेहऱ्यावर स्मितहास्य होतं.