नाशिक : कांद्याच्या दरात सातत्याने होणाऱ्या घसरणीचा फटका थेट शेतकऱ्यांना बसत आहे. ‘नाफेड’कडून सुरू असलेली कांदा खरेदी व्यापाऱ्यांकडून होत आहे. व्यापारी दोनशे ते तीनशे रुपयांनी कांदा खरेदी करून ‘नाफेड’ला पाचशे रुपयांनी देतो. परंतु, त्यामुळे शेतकऱ्याचा प्रत्यक्ष फायदा होत नाही. ‘नाफेड’ने स्वत: मार्केटमध्ये उतरून कांदा खरेदी करावा, अशी मागणी माजी मंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी जिल्हा दौऱ्यावर असताना केली. ‘नाफेड’ने आतापर्यंत कांदा खरेदीबाबत दिलेली आकडेवारी चुकीची असल्याचा दावाही भुजबळ यांनी केला आहे.
काही व्यापारी २००-३०० रुपये क्विंटलने कांदा खरेदी करून ‘नाफेड’ला तो ६०० रुपयांनी देत असल्याचा प्रकार मी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला आहे. ‘नाफेड’ला थेट बाजार समितीत उतरायला सांगा अशी विनंतीही केली आहे. ‘नाफेड’ने लासलगावसारख्या बाजार समितीत जाऊन कांदा खरेदी करावा, माल घेऊन येणाऱ्या ट्रॅक्टरवर बोली लावायला हवी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. कांदा खरेदीबाबत ‘नाफेड’ने दिलेले आतापर्यंतचे आकडे चुकीचे असल्याचा दावा भुजबळ यांनी केला.
सवलती दिल्यात तरच शेती वाचेल
जिल्ह्यात कोथिंबीर, मेथी पिकविणाऱ्या शेतकऱ्यांवरदेखील माल रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली आहे. बाजार समितीमध्ये कोथिंबीर आणल्यानंतर गाडी भाडेही सुटत नाही अशी परिस्थिती आहे. शेतकऱ्याची मेहनत मातीमोल ठरत असून, त्यांना रस्त्यावर माल फेकून द्यावा लागत आहे. याशिवाय अवकाळी पावसाचे संकटदेखील घोंघावत आहे. भाजीपाल्याचे भाव वाढले, तर नागरिकांनीही थोडे सहन करायला हवे. उद्योगांना करोडो रुपयांची माफी देणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांनाही सवलती दिल्या तरच शेती वाचेल असेही भुजबळ म्हणाले.