मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस आणि प्रवक्ते संदीप देशपांडे यांना ३ मार्चला मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात चार जणांकडून मारहाण करण्यात आली होती. त्या मारहाणीत देशपांडे यांच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली होती. संदीप देशपांडे यांच्यावर त्यानंतर हिंदुजा रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. संदीप देशपांडे यांनी मारहाणीच्या दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिलं होतं. करोना घोटाळा बाहेर काढल्यानं मारहाण झाल्याचा दावा त्यांनी केला होता. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून देशपांडे मारहाण प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. देशपांडे यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांचं सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी भांडूपमधून कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्याला ताब्यात घेतलं होतं. संदीप देशपांडे हल्ला प्रकरणी मनसेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. दादर परिसरात मनसेकडून मूक रॅली काढण्यात आला होता. यावेळी मनसे नेते नितीन सरदेसाई हे देखील उपस्थितीत होते.
नितीन सरदेसाई काय म्हणाले?
संदीप देशपांडे यांच्यावर भ्याड हल्ला झाला त्याचा आम्ही निषेध करत आहोत, असं नितीन सरदेसाई यांनी म्हटलं आहे. राजकीय सूड भावनेतून अशा प्रकारच्या घटना घडत आहेत हे लोकशाहीला काळिमा फासणारं आहे. शिवाजी पार्क नाही तर महाराष्ट्राच्या जनतेमध्ये देखील संतापाची लाट आहे, असं सरदेसाई म्हणाले.
जे कुणी आरोपी पकडले गेले आहेत असं सांगत आहेत त्यापेक्षा अधिक लोक यामागं होती. देशपांडे यांच्यावरील सूत्रधारांना पकडणं आवश्यक आहे. या प्रकरणाचा तपास सूत्रधारांपर्यंत पोहोचला नाही तर महाराष्ट्र सैनिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटू शकते, असं नितीन सरदेसाई म्हणाले.
लोकशाहीत कुणी कुणाची भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढतात म्हणून त्यांच्यावर हल्ला करणं योग्य नाही. या प्रकरणाच्या सूत्रधारांपर्यंत तपास गेला नाही तर मनसेकडून तीव्र प्रतिक्रिया उमटेल, असं नितीन सरदेसाई म्हणाले.
संदीप देशपांडे यांच्यावर ३ मार्चला दिवसांपूर्वी हल्ला करण्यात आला होता. त्याच्या निषेधार्थ मनसे मार्फत आज शिवाजी पार्क परिसरात मूक रॅली काढण्यात आली. ही रॅली दादर सेल्फी पॉईंट पासून सुरु करण्यात आली.या रॅलीमध्ये काळी फीत बांधून झालेल्या प्रकाराचा निषेध करण्यात आला.