आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी सेबीवर प्रश्न उपस्थितीत करत अदानी समूहाशी संबंधित असलेल्या संशयास्पद मॉरिशसस्थित कंपन्यांच्या मालकीची अद्याप कोणतीही चौकशी का केली नाही, असा प्रश्न विचारला. राजन यांच्यानुसार मॉरिशसस्थित या चार फंडांनी त्यांच्या $६.९ अब्ज कॉर्पसपैकी सुमारे ९०% रक्कम अदानी समूहाच्या शेअर्समध्ये गुंतवली आहे. या प्रकरणाचा कोणताही तपास झाला नसताना सेबीला यासाठीही तपास यंत्रणांच्या मदतीची गरज होती का?, असा सवाल त्यांनी केला. मॉरिशसस्थित एलारा इंडिया अपॉर्च्युनिटीज फंड, क्रेस्टा फंड, अल्बुला इन्व्हेस्टमेंट फंड आणि एपीएमएस इन्व्हेस्टमेंट फंड या शेल कंपन्या बनावट असल्याचा आरोप झाल्यानंतर गेल्या दोन वर्षापासून ते संशयाच्या भोवऱ्यात आहेत.
याच कंपन्या जानेवारी महिन्यात पुन्हा एकदा चर्चेत आल्या जेव्हा हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहाने शेल कंपन्यांचा वापर करून शेअर्सची किंमत वाढवल्याचा आरोप केला. पण अदानी समूहाने वरील आरोप वारंवार फेटाळून लावले.
नियामकांना त्यांचे काम करू देण्याचा मुद्दा
रघुराम राजन यांनी एका मुलाखतीदरम्यान सेबीच्या कामकाजावर बोट उचलले. त्यांनी म्हटले की, “मुद्दा सरकार आणि व्यवसाय यांच्यातील गैर-पारदर्शक संबंध कमी करणे व खरोखर नियामकांना त्यांचे काम करू देणे. अदानी शेअर्समध्ये व्यापार करणाऱ्या मॉरिशस फंडांच्या मालकीचा शोध सेबीने अद्याप का घेतला नाही? यासाठी त्यांना तपास यंत्रणांच्या मदतीची गरज आहे का?”