सांगली: ‘राज्यातील दूध उत्पादक अडचणीत असताना सरकारमधील मंत्र्यांनी स्वतःच्याच दूध संघातील दूध खरेदी करून अनुदान लाटले. दूध उत्पादक उपाशी असताना सरकार मात्र तुपाशी आहे,’ अशी टीका आमदार यांनी राज्य सरकारवर केली. त्यांनी आटपाडी येथे गायीला दुधाचा अभिषेक घालून आणि गायींसह रस्त्यावर ठिय्या मारून दूध दरवाढीचे आंदोलन केले.

राज्यात दूध उत्पादकांना सध्या गायीच्या दुधाला प्रतिलिटर १५ ते २० रुपयांचा दर मिळत आहे. दुधाचे दर कमी झाल्याने दूध उत्पादकांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. या स्थितीत राज्य सरकारने गायीच्या दुधाला प्रतिलिटर दहा रुपये अनुदान द्यावे, तसेच दूध पावडरीसाठी प्रतिकिलो ५० रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी भाजपसह मित्र पक्षांनी केली आहे. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी राज्यभर आंदोलन करण्यात आले. भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आटपाडी तालुक्यातील मल्हारपूर ते पंढरपूर मार्गावर आंदोलन केले. यावेळी त्यांनी कर्यकर्त्यांसह गायीला दुधाचा अभिषेक घालून ठिय्या आंदोलन केले.

यावेळी बोलताना आमदार पडळकर म्हणाले, ‘अडचणीत असलेल्या दूध उत्पादकांना सरकारने मदत करावी यासाठी भाजपसह मित्र पक्षांनी यापूर्वीच निवेदने दिली आहेत. मात्र, अजूनही सरकारला जाग आलेली नाही. गंभीर बाब म्हणजे सरकारमधील मंत्र्यांच्या दूध संघांकडूनच सरकार दुधाची खरेदी करत आहे. यातून मंत्रीच अनुदान लाटत आहेत. हा प्रकार म्हणजे दूध उत्पादक उपाशी आणि सरकार तुपाशी असाच म्हणावा लागेल. उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांच्या दूध संघांचे दूध खरेदी करून सरकार त्यांना अनुदान देत आहे. सरकारने तातडीने राज्यातील सर्व दूध उत्पादकांना प्रतिलिटर दहा रुपयांचे अनुदान द्यावे. दूध पावडरीसाठी प्रतिकिलो ५० रुपये अनुदान द्यावे, अन्यथा भाजपसह सर्व मित्रपक्ष तीव्र आंदोलन करतील.’

दरम्यान, जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीच दूध दरवाढ आंदोलनाला सुरुवात झाली. रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आष्टा-भिलवडी आणि तासगाव-कराड मार्गावर दुधाचे टँकर फोडले. इस्लामपूर येथे दुधाची वाहतूक करणारी वाहने अडवून दुधाचे मोफत वाटप केले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी पलूस येथे दुधाची वाहने अडवून घोषणाबाजी केली. आंदोलनामुळे दूध संघांच्या संकलनावर परिणाम झाला असून, अनेक ठिकाणी पोलिस संरक्षणात दुधाची वाहतूक करावी लागली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here