भारतीय संघ व्यवस्थापनाने वैद्यकीय स्टाफशी सल्लामसलत करून, आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग) चे बहुतेक सामने खेळलेल्या आणि एकदिवसीय विश्वचषकाच्या आयोजनात सहभागी असलेल्या वेगवान गोलंदाजांच्या वर्कलोड व्यवस्थापनासाठी एक योजना तयार केली आहे. शमीने पहिले दोन कसोटी सामने खेळले आणि तो एकदिवसीय संघाचाही एक भाग आहे. इंदूर कसोटीत त्याच्या जागी उमेश यादवचा संघात समावेश करण्यात आला होता.
सिराजने पहिल्या तीन कसोटींमध्ये केवळ २४ षटके टाकली आणि १७ ते २२ मार्च दरम्यान खेळल्या जाणाऱ्या तीनही एकदिवसीय सामन्यांमध्ये तो प्लेइंग इलेव्हनमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या शेवटच्या कसोटीत त्याला विश्रांती दिली जाऊ शकते.
शमी या मालिकेत आतापर्यंतचा यशस्वी वेगवान गोलंदाज राहिला आहे. त्याने दोन सामन्यात ३० षटके टाकत ७ विकेट्स मिळवले आहेत. चौथ्या कसोटीसाठीच्या पिचवर संघाला त्याच्यासारख्या गोलंदाजाची आवश्यकता लागणार आहे. अशी पिच जी रिव्हर्स पीचसाठी अनुकूल असेल. भारताने या मालिकेत २-१ अशी आघाडी मिळवली आहे पण सोबतच जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी त्यांना हा सामना जिंकावा लागेल.
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमधील हा शेवटचा सामना अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. बीसीसीआय ‘क्युरेटर्स’ तपोश चॅटर्जी आणि आशिष भौमिक जेव्हा इथली जबाबदारी स्वीकारतील तेव्हा खेळपट्टीचा अंदाज कसा असेल हे अद्याप कळलेले नाही. ते म्हणाले, “गेल्या काही दिवसांपासून बीसीसीआयची ग्राउंड आणि खेळपट्टी समिती स्थानिक क्युरेटर्सना सूचना देत आहे, पण निश्चितच आमचा प्रयत्न कसोटी सामन्यांसाठी चांगली खेळपट्टी तयार करण्याचा आहे.”