एक पस्तीस वर्षीय महिला नशेच्या अवस्थेत यशवंत उद्यानाच्या ठिकाणी आढळून आली. नागरिकांनी तिला बघताच पोलीस ठाण्यात याविषयी माहिती देण्यात आली. पोलीस प्रशासन या ठिकाणी दाखल झालं. मात्र नेमका काय हा प्रकार काय आहे? हे नशेत असलेल्या महिलेने सांगितल्यानंतर सर्वांना धक्का बसला.
हा भाग बीड भागात येत नाही. हा शिवाजीनगर भागात येतो. यामुळे त्या महिलेला शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पाठवण्यात आलं. बीडच्या बस स्थानकात ही महिला दारूच्या नशेत आढळून आली. याचा गैरफायदा घेत महिलेला काही जणांनी कुठलंतरी कारण सांगून आपल्या सोबत बस स्थानकावरून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक चौक या ठिकाणी यशवंत उद्यानात आणलं. इथपर्यंतच ती महिला पोलिसांना माहिती सांगते. मात्र त्यानंतर महिलेसोबत रात्रभर नेमकं काय घडलं? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
वैद्यकीय तपासणीसाठी महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. वैद्यकीय तपासणीनंतरच त्या महिलेसोबत नेमका काय प्रकार घडला? हे समोर येईल अशी माहिती पोलिसांनी दिली. महिलेची तातडीने वैद्यकीय तपासणी करणं गरजेचं होतं. मात्र पोलिसांनी काही तास तिला पोलीस ठाण्यातच ठेवलं आणि नंतर वैद्यकीय तपासणीला पाठवलं. यामुळे नागरिकांनी पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. कारण बस स्थानक ते उद्यान या दरम्यानच्या अंतरात तीन पोलीस स्टेशन येतात. पण कुठल्याही पोलीस स्टेशनच्या पोलिसांना हा प्रकार लक्षात का आला नाही? असा प्रश्न विचारण्यात येत आहे.
शहरात नशेखोरांचा धुमाकूळ दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या प्रकरणी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन कोणतीही कारवाई होत नाहीए. आता या महिलेला नेमकं कोणी, कशा पद्धतीने तिथपर्यंत नेलं. आणि तिच्यासोबत रात्रभर काय काय घडलं? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.