बुलढाणा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास काही ठिकाणी वीज कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत.
बुलढाणा जिल्ह्यात मध्यरात्रीपासून वादळी वाऱ्यासह अनेक ठिकाणी धो धो पाऊस बरसला. काही ठिकाणी वीज पडण्याच्या घटना घडल्या. बुलढाण्याच्या शेजारी असलेल्या साखळी गावात वीज पडून मेंढपाळाच्या तब्बल १६ मेंढ्या दगावलेल्या आहेत.
हवामान खात्याने ५ मार्च ते ८ मार्च या दरम्यान वादळी वाऱ्यासह विजेच्या गडगडात होऊन अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मागील दोन दिवसात जिल्ह्यात बुलढाणा शहराच्या जवळच्या परिसरात आणि इतर तालुक्यात पावसाची नोंद झाली. वातावरणामध्ये मोठा बदल दिसून येत आहे. सकाळी सूर्याचे दर्शन होत नाही, अशी स्थिती आहे. वातावरणामध्ये देखील गारवा निर्माण झालेला पाहायला मिळत आहे.
बुलढाण्यात मध्यरात्री अडीचच्या सुमारास अवकाळी पावसानं हजेरी लावली. पाऊस सुरु असताना वीज कोसळली. यामुळं १६ मेंढ्यांचा मृत्यू झाला तर दोन मेंढ्या जखमी झाल्या आहेत. जिल्ह्यातील साखळी गावात ही घटना घडली.
एकंदरीत ज्या होळीच्या सणाच्या पूर्वीच उन्हाची चाहूल लागण्यास सुरुवात होते त्याचवेळी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. विजय बोराडे या मेंढपाळाच्या १६ मेंढ्या दगावल्या आहेत. विजय बोराडे यांनी त्यांचं पाच लाख रुपयांचं नुकसान झालं आहे.
दरम्यान, हवामान विभागानं बदलत्या वातावरणामुळं राज्यात मराठवाडा ते विदर्भात पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.