गेल्या दोन महिन्या पासून कांद्याच्या भावात मोठी घसरण होत असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कांदा भाव घसरणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी होळीचे औचित्य साधून येवल्याच्या नगरसूल येथील कृष्णा डोंगरे या शेतकऱ्याने त्याच्या शेतातील दीड एकर कांदा पिकाला अग्निडाग देऊन आगळे वेगळे आंदोलन केले. दीड एकरावरील कांदा त्यांनी शेतात ठिकठिकाणी पेटवून दिला आहे.
कांद्याच्या भावात घसरण झाल्यानंतर शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी आंदोलने केली आहेत. मात्र, तरी देखील भावात सुधारणा झालेली नाही. त्यामुळे डोंगरे यांनी टोकाचे पाऊल उचलत शेतात ठिकठिकाणी सरण रचून कांदा पेटवून देत संताप व्यक्त केला. शासनाने आता तरी दखल घेऊन कांद्या सोबत इतर शेतमालाला योग्य भाव द्यावा अशी मागणी डोंगरे यांनी केली आहे.
कृष्णा डोंगरे काय म्हणाले?
आज केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिलं आहे. सत्तासंघर्षात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिलं गेलं आहे. शेतकऱ्यांचं जगणं यांना मान्य नाही. कांदा उत्पादकांनी कष्टानं पिकवलेला कांदा जाळू टाकला आहे. आजचा दिवस काळा दिवस आहे, असं कृष्णा डोंगरे म्हणाले आहेत. शेतकरी जगला काय आणि मेला काय सरकारला देणं घेणं नाही, असं कृष्णा डोंगरे म्हणाले. सरकारचं शेतकऱ्यांकडे कसल्याही प्रकारचं लक्ष नाही, असं कृष्णा डोंगरे यांनी म्हटलं.
कांद्याचा प्रश्न गंभीर
शेतकऱ्यांनी कांद्याला हमीभाव मिळाला पाहिजे अशा घोषणा दिल्या. कांद्याचे दर पडल्यानं शेतकऱ्यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या नावानं बोंबा मारल्या. राज्यभरात कांदा उत्पादक आक्रमक झाले असून राजकीय नेत्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे.