Ravindra Dhangekar meets Sharad Pawar in Pune | कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी सोमवारी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर पुण्यात शरद पवार यांची पत्रकार परिषद झाली.

 

Sharad Pawar Vs Chandrakant Patil
शरद पवार आणि चंद्रकांत पाटील

हायलाइट्स:

  • शरद पवार यांनी कसबा पोटनिवडणुकीसह अन्य राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले
  • प्रश्नोत्तरांच्या ओघात शरद पवार यांना चंद्रकांत पाटील यांच्याविषयी विचारणा करण्यात आली
  • शरद पवारांच्या वक्तव्यावर एकच हशा पिकला
पुणे: राजकारणात कोणतीही विखारी, द्वेषपूर्ण किंवा वैयक्तिक स्वरुपाची टीका न करताही समोरच्याचा पाणउतारा कसा करायचा, हे कसब साधलेल्या राज्यातील मोजक्या नेत्यांपैकी एक म्हणून शरद पवार यांचे नाव घेतले जाते. सूचक आणि मोजक्या शब्दांमध्ये ते कायमच विरोधकांचा समाचार घेत असतात. त्यांच्या प्रत्येक वक्तव्याची राजकीय वर्तुळात कायम चर्चाही रंगते. शरद पवारांच्या प्रत्येक वाक्याला महाराष्ट्राच्या राजकारणात इतके महत्त्व का आहे, याचा प्रत्यय सोमवारी पुण्यातील पत्रकार परिषदेत आला. यावेळी शरद पवार यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचा त्यांच्या खास शैलीत समाचार घेतला.

कसबा पोटनिवडणुकीतील विजयी उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी सोमवारी शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी कसबा पोटनिवडणुकीसह अन्य राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी प्रश्नोत्तरांच्या ओघात शरद पवार यांना चंद्रकांत पाटील यांच्याविषयी विचारणा करण्यात आली. त्यावर शरद पवार यांनी क्षणाचाही विलंब न लावता,’शहाण्या लोकांबद्दल प्रश्न विचारा’, असे म्हटले. त्यांच्या या वक्तव्यावर एकच हशा पिकला. शरद पवार यांनी आपल्या या एका कृतीने चंद्रकांत पाटील यांचे नावही न घेता त्यांचा अक्षरश: पाणउतारा केला. या प्रसंगाची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
महाराष्ट्रात फिरतोय लोक सांगतात आम्हाला बदल हवाय,कसब्याच्या विजयानंतर शरद पवारांचं वक्तव्य, धंगेकरांचं कौतुक

महाराष्ट्रातील जनतेला बदल हवाय: शरद पवार

कसबा पोटनिवडणूक निकालाच्या अनुषंगाने शरद पवार यांनी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. कसब्यात महाविकास आघाडी एकदिलाने लढल्यामुळे विजय मिळाला. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी कायम राहावी, तिन्ही पक्षांनी एकत्रपणे काम करावे, यासाठी माझा प्रयत्न राहील. महाराष्ट्रातील जनतेला बदल हवाय, हे मला जाणवतेय. गेल्या काही दिवसांमध्ये मी राज्याच्या अनेक भागांमध्ये फिरलो आहेत. तेथील लोक सांगत आहेत की, आम्हाला बदल हवाय. तुम्ही सगळ्यांनी एकत्र या, असे शरद पवार यांनी सांगितले.

रवींद्र धंगेकरांच्या विजयाची खात्री नव्हती पण….

या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी, ‘मला कसबा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांच्या विजयाची खात्री नव्हती’, असे म्हटले. गिरीश बापट यांच्या अनेक वर्षांच्या प्रभावामुळे कसबा हा भाजपचा बालेकिल्ला झाला होता. नारायण, सदाशिव आणि शनिवार पेठ या भागातील मतदार भाजपशी वर्षानुवर्षे बांधले गेले होते. मात्र, रवींद्र धंगेकर यांना सर्व स्तरातून पाठिंबा असल्यामुळे अगदी पेठांच्या परिसरातूनही त्यांना मतं मिळाली. रवींद्र धंगेकर यांच्या कामाची दखल मतदारांनी घेतली होती. यामुळे कसब्यात त्यांचा विजय झाला, असे शरद पवार यांनी म्हटले.

who is धंगेकर? म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांचा प्रचारातील व्हिडिओ व्हायरल

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here