वाशिमः समृद्धी महामार्गावर होणारे अपघात काही थांबले जात नाहीये. वाशिम जिल्ह्यातील वनोजा इंटरचेंज पासून छत्रपती संभाजीनगरकडे सात किलोमीटर अंतरावर आज सकाळी भीषण अपघात झाला. रोडच्या कडेला असलेल्या डीवाईडर व पुलाच्या कठड्याला GJ 27 K 8271 क्रमांकाच्या गाडीने धडक दिली. या गाडी मध्ये गुजरात येथील गोयल दांपत्य छत्रपती संभाजीनगर कडून नागपूरकडे जात होते. गाडीवरचे नियंत्रण सुटले व हा अपघात झाला असल्याचा अंदाज आहे. या अपघातामध्ये एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर पुरुषाच्या डोक्यालाही गंभीर इजा झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
यावेळी अर्ध्या ते एक तासानंतर रूग्णवाहिका पोहचली असल्याची माहिती आहे. यामुळे जखमींना मदत मिळण्यास विलंब झाला असुन समृद्धी महामार्गावर तातडीने मदत मिळण्याच्या प्रशासनाने केलेल्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. माहामार्गावर अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळत नसल्याने मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन अपघातग्रस्तांना लवकर मदत देण्याची मागणी केली जात आहे.