पोलिसांच्या चौकशीत आरोपी पतीने सांगितले की, त्याला त्याच्या पत्नीवर संशय होता. बायकोचे कोणाशी तरी अफेअर आहे, असे त्याला वाटत होते. त्याच रागातून त्याने ही हत्या केली. सीता साहू असे मृत पत्नीचे नाव आहे. तर, पवन ठाकूर असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सध्या पोलीस आरोपी पवन ठाकूरची चौकशी करत आहेत.
पोलिसांनी आरोपी पवन ठाकूर याला बनावट नोटांसह अटक केली होती. याप्रकरणी पोलीस आरोपीच्या घरी शोध घेण्यासाठी पोहोचले होते. यानंतर येथील दृश्य पाहून पोलीसही हैराण झाले. आरोपीच्या घरातून पोलिसांना विचित्र दुर्गंधी येत होती. पोलिसांनी घराची झडती घेत असताना पाण्याची टाकी उघडली असता त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. या पाण्याच्या टाकीत पोलिसांना मृतदेहाचे छोटे तुकडे सापडले. पोलिसांनी आरोपीच्या घरातून बनावट नोटांचे बंडल आणि नोट मोजण्याचे मशीनही जप्त केले आहे.
आरोपी पवन ठाकूर याने पोलिसांना सांगितले की, या दोघांनी प्रेम विवाह केला होता. तो पत्नी आणि दोन मुलांसह भाड्याच्या घरात राहत होता. त्याला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता, त्यामुळे त्याने ५ जानेवारी रोजी तिची हत्या केली. त्यानंतर मृतदेहाचे अनेक तुकडे करून ते पाण्याच्या टाकीत टाकले. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी आपल्या दोन मुलांना त्यांच्या आई-वडिलांकडे तखतपूर येथे सोडून आला. सध्या पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.