पुणे : तोरणा गडाच्या पायथ्याशी असलेल्या वेल्हे तालुक्यात एकाची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. दुपारच्या सुमारास ही घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जात असून खून केल्यानंतर आरोपी दुचाकीवरून फरार झाले आहेत. हत्येबाबतची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, नवनाथ उर्फ पप्पूशेठ रेणूसे (वय ३८ रा. पाबे, रामवाडी) असं खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. नवनाथ रेणूसे हे वेल्हे तालुक्यातील पाबे गावात वास्तव्यास होते. ते जमीन-खरेदी विक्रीचे काम करत होते, अशी माहिती समोर आली आहे. रेणूसे हे आज वेल्हे तालुक्याच्या ठिकाणी आले होते. दुपारच्या सुमारास ते वेल्हेतील हॉटेल विसावामध्ये बसले असताना अज्ञात हल्लेखोर घटनास्थळी दाखल झाले झाले. त्यांनी नवनाथ यांच्या तोंडावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. तसंच त्यांच्यावर गोळीबार केला आणि आरोपी दुचाकीवरुन पळून गेले. यामध्ये गंभीर जखमी होऊन रेणूसे यांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

गर्लफ्रेंडने लग्न केलं, तरीही प्रेमप्रकरण सुरूच; तरुणाकडून विरोध करणाऱ्या सासूवरच अत्याचार

नवनाथ रेणूसे यांची हत्या करणारे आरोपी हे त्यांच्या गावातीलच असल्याची प्राथमिक माहिती वेल्हे पोलिसांकडून मिळाली आहे. खून झालेल्या तरुणावर चार गोळ्या झाडण्यात आल्या असून आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी पूर्ण तालुक्यात नाकाबंदी केली आहे.

दरम्यान, या हत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेलं नसून पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे. आरोपींच्या अटकेनंतरच या हत्येमागील कारण स्पष्ट होणार आहे. मात्र अचानक घडलेल्या या घटनेने वेल्हे तालुका हादरला असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण परसलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here