हवेतून होतोय संसर्ग, मात्र करोना नाही
राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमधील व्हायरल इन्फेक्शन्सचे संचालक डॉ. अजय शुक्ला यांनी माहिती देताना सांगितले की, आता करोना संपला आहे, पण H3N2 सारखे इतर अनेक व्हायरल इन्फेक्शन्स अजूनही सुरू आहेत. कमी प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांसाठी हा संसर्ग गंभीर असू शकतो.लोकांनी मास्क वापरणे सुरू ठेवले तर खूप मदत होईल, असेही ते पुढे म्हणाले. तसेच, आम्ही या विषाणूंसाठी लसीकरण सुरू करण्याचा निर्णय घेत आहोत. H3N2 संसर्ग सध्या हवेत आहे परंतु तो करोनाचा प्रकार नसल्याचे ते म्हणाले. राम मनोहर लोहिया हॉस्पिटलचे एमडी (छाती) डॉ. अमित सुरी यांनी सांगितले की, आम्हाला दररोज २०-२५ % विषाणू संसर्गाचे रुग्ण आढळत आहेत. अनेक रुग्ण वृद्ध आहेत.करोना महामारीच्या काळात पाळण्यात आलेल्या खबरदारीचे यावेळीही पालन करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.
H3N2 हे श्वसनाच्या आजाराचे कारण आहे
या संदर्भात, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने म्हटले आहे की, इन्फ्लुएंझा ए उपप्रकार H3N2 हे देशातील सध्याच्या श्वसनाच्या आजाराचे प्रमुख कारण आहे. ECMR-DHR (आरोग्य संशोधन विभाग) ने ३० VRLDs (व्हायरल रिसर्च आणि डायग्नोस्टिक प्रयोगशाळा) मध्ये पॅन-रेस्पीरेटरी व्हायरस सर्व्हिलन्स सिस्टमची स्थापना केली आहे. ICMR नुसार, गंभीर तीव्र स्वरुपाच्या श्वसन संक्रमणासाठी (SARI) दाखल झालेल्या सर्व रुग्णांपैकी जवळजवळ अर्ध्या रुग्णांना तसेच इन्फ्लूएंझा सारख्या आजारावर उपचार घेत असलेल्या बाह्यरुग्णांना इन्फ्लूएंझा A H3N2 आढळले आहे.
काय आहेत या रोगाची लक्षणे
विषाणूच्या या उप-प्रकाराची लागण झालेल्या रुग्णांची संख्या इतर इन्फ्लूएंझा उप-प्रकारांची लागण झालेल्या रुग्णांपेक्षा अधिक आहे, असे आयसीएमआरने सांगितले आहे.इन्फ्लूएंझा A H3N2 च्या दाखल झालेल्या रुग्णांपैकी सुमारे ९२ टक्के रुग्णांना ताप होता, ८६ टक्के लोकांना खोकला होता, २७ टक्के लोकांना श्वासोच्छवासाचा त्रास होता आणि १६ टक्के लोकांना घरघर लागली होते. याशिवाय १६ टक्के लोकांना न्यूमोनियाची लक्षणे होती आणि ६ टक्के लोकांना दम्याचा झटकाही आला होता.
अँटिबायोटिक्सचा वापर थांबविण्याचा सल्ला
इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) अँटिबायोटिक्सचा वापराबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. आयएमएने डॉक्टरांना केवळ आजाराशी संबंधित उपचार देण्यास सांगितले आहे.यासाठी अँटिबायोटिक्स देण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले. आयएमएने सांगितले की, लोकांनी अँथ्रासिन आणि अमोक्सिक्लॅव्ह सारखी अँटीबायोटिक्स सातत्याने घेणे सुरू केले आहे. एकदा त्यांना बरे वाटू लागले की ते बंद करतात. हे थांबवण्याची गरज आहे. कारण हे अँटिबायोटिक नंतर शरीरात निष्प्रभ होते. जेव्हा कधी अँटिबायोटिक्स प्रत्यक्षात वापर केला जाईल तेव्हा मग ते प्रतिकारामुळे काम करणार नाहीत, असे आयएमएने म्हटले आहे.