आग्राच्या कमला नगर येथील रहिवासी असलेले नरेंद्र सिंह हे हस्तकलेचे काम करतात. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. मोठ्या मुलीचे लग्न झाले आहे. लहान मुलगी वंदना (वय २२ वर्षे) ही टेधी बगिया येथील महाविद्यालयात एम. कॉमची विद्यार्थिनी होती. ३ मार्च रोजी तिचा वाढदिवस होता. तिला तिचा वाढदिवस तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत साजरा करायचा होता. पण तिच्या वडिलांनी त्यासाठी तिला परवानगी दिली नाही.
सकाळी खोलीचे दृश्य पाहून वडिलांना धक्काच बसला
त्यामुळे तिने रात्री घरातील मंडळींसोबत केक कापला आणि वाढदिवस साजरा केला. त्यानंतर रात्री घरातील सारे झोपायला गेले. वंदनाही तिच्या खोलीत गेली. सकाळी वंदना खोलीबाहेर आली नाही म्हणून नरेंद्र हे तिच्या खोलीत गेले. समोरील दृश्य पाहून हा पिता अक्षरश: कोसळला आणि हंबरडा फोडून रडू लागला. त्यांचा आवाज ऐकून कुटुंबातील इतर सदस्यही पोहोचले. तेव्हा तेही ते दृश्य पाहून हादरुन गेले. तिने तिच्याच ओढणीने गळफास घेतला होता. कुटुंबियांनी तिला तात्काळ खाली उतरवलं आणि एसएन इमर्जन्सीमध्ये नेलं. मात्र, तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
कुटुंबाच्या जवळच्या लोकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, वंदनाला तिच्या मित्र- मैत्रिणींसोबत तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बाहेर जायचे होते. परंतु वडिलांनी तिला त्याची परवानगी दिली नाही. याचा तिला राग आला. याप्रकरणी पोलिसांनी प्रकरणाची दखल घेतली असून मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं असून पुढील तपास सुरु आहे.