बसमधील प्रवासी देखील हतबल झाले होते. तेव्हा बस चालक आणि प्रवाशांनी तात्काळ वेळेचे गांभीर्य लक्षात घेऊन १०८ रुग्णवाहिका फोन केला. रुग्णवाहिकेचे डॉक्टर त्या महिलेच्या मदतीला धावून आले आणि त्या महिलेची बसमध्येच सुखरूप प्रसूती केली.
महिलेसाठी रुग्णवाहिका १०८ ठरली आधारवड
शीतल राठोड या गर्भवती महिलेला बस मध्येच प्रसूती वेदना सुरु झाल्या. महिलेला रुग्णालय गाठणं अवघड होऊन बसलं होतं. सदर ही माहिती मिळाल्यानंतर १०८ नंबर रुग्णवाहिकेचे डॉक्टर आणि कर्मचारी तात्काळ त्या महिलेच्या मदतीला धावून आले आणि त्या महिलेची बसमध्येच सुखरुप प्रसूती केली. सदर मातेने गोंडस बालिकेला जन्म दिल्याने सर्वांनी निश्वास सोडला. त्यानंतर माता आणि बालिकेला रुग्णवाहिकाद्वारे सुखरुप रुग्णालयात पोहचविण्यात आले. यावेळी रुग्णवाहिका १०८ मधील डॉक्टरांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आरोग्य व्यवस्था बिघडलेली, रुपाली चाकणकरांची तात्काळ कारवाई
ही महिला नशीबवान होती म्हणून तिला तात्काळ रुग्णवाहिकेची सोय झाली, डॉक्टर मिळाले आणि तिची सुखरुप प्रसूती झाली. मात्र, कालच काही अशा घटना समोर आल्या होत्या ज्यामध्ये सोयींअभावी महिलांना डॉक्टरांविना प्रसूती करावी लागली. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात प्रसूतीसाठी आलेल्या गर्भवती महिलेची डॉक्टर नसल्याने स्वतःच्या आईनेच प्रसूती केल्याचा धक्कादायक घटना समोर होती. तर, नागपुरातील अंबाझरी तलाव परिसरात एका अल्पवयीन गर्भवतीने युट्यूबवर बघून स्वतःची प्रसूती केली, त्यानंतर तिने तिच्या बाळाची हत्या केली. तर कोल्हापूर जिल्ह्यात खड्ड्यात गेलेल्या रस्त्यामुळे गर्भवती महिलेची रस्त्यातच प्रसूती करावी लागल्याची घटनाही पुढे आली.
या तिन्ही घटनांची नोंद महिला आयोगाने घेतलेली असून राज्यातील बिघडलेली आरोग्य व्यवस्था यानिमित्ताने अधोरेखित होत असल्याचं सांगत या घटनांची संपूर्ण चौकशी होईपर्यंत आणि दोषींना शिक्षा होईपर्यंत संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिल्या आहेत.