पुणे : चिंचवडची पोटनिवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत भाजपच्या अश्विनी जगताप मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या. मात्र आमदारकीची शपथ घेण्याअगोदरच नागरिकांच्या समस्यांसाठी जाणून घेण्यासाठी त्या थेट सांगवी येथील औंध जिल्हा रुग्णालयात अचानक पोहोचल्या. रुग्णांना उपचार न करता पाठवल्याच्या तक्रारी त्यांना प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार आमदार जगताप यांनी डॉक्टरांशी चर्चा करत त्यांना चांगलेच धारेवर धरले. रुग्णांना उपचाराविना पाठवले तर मी पुन्हा येईल, असा इशाराच अश्विनी जगताप यांनी दिला.

अनेक दिवसांपासून औंध जिल्हा रुग्णालयात रुग्णांची हेळसांड होत असून उपचारविना त्यांना घरी पाठवले जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. रुग्णांनी देखील याबाबत संताप व्यक्त करीत डॉक्टरांशी हुज्जत घातल्याचे प्रकार घडले होते. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हे वैद्यकीय क्षेत्रातील काम आवडीने करत. सर्व सामन्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, असा त्यांचा प्रयत्न असे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या पत्नी आणि विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांनी वैद्यकीय सेवेला प्राधान्य देऊन थेट रुग्णालयात दाखल होत डॉक्टरांना धारेवर धरले.

अवकाळीचा तडाख्याने शेतकरी हतबल! नाशिक जिल्ह्यात २,६८५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

अश्विनी जगताप यांनी यावेळी रुग्णालयाच्या सर्व विभागांची पाहणी केली. या रुग्णालयातून एकही रुग्ण विनाउपचार गेला तर मी पुन्हा येईल अशी तंबीच त्यांनी दिली. अश्विनी जगताप यांच्या या कामाचे कौतुक होत असून कुठलेही सत्कार-समारंभ स्वीकारता त्या थेट कामासाठी बाहेर पडल्याचं सांगत नागरिकांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे. रुग्णांशी संवाद साधत कुठलीही अडचण आल्यास थेट माझ्याशी संपर्क साधा, असं आवाहन जगताप यांनी केलं आहे.

दरम्यान, लक्ष्मण जगताप यांनी रुग्णांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी आमदार निधीच्या माध्यमातून प्रयत्न केले होते. तसेच मी देखील रुग्णांना चांगली सेवा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं अश्विनी जगताप यांनी सांगितलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here