ही दुर्दैवी घटना सोमवारी रात्री वैजापूर पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या समृद्धी महामार्गावरील हडस पिंपळगाव जवळ घडली. अनिल किसन राठोड (वय -३५ वर्ष) भाग्यश्री अनिल राठोड (वय- ३२ वर्षे) रोहित सुनील राठोड (वय – १२ वर्षे) सर्व रा. पळशी तांडा क्र-२, ता. जि छत्रपती संभाजीनगर अशी मृतांची नावे आहेत.
सविस्तर अधिक माहिती अशी की, अनिल राठोड हे सोमवारी रात्री शिर्डी येथून समृद्धी महामार्गावरून छत्रपती संभाजीनगरला येण्यासाठी कारने निघाले होते. कारमध्ये पती पत्नी पुतण्या आणि दोन मुले असे पाच जण होते. सर्वजण घरी येत असताना वैजापूरला आल्यानंतर मालवाहू ट्रक आणि राठोड यांच्या कारचा अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की, राठोड यांच्या कारच्या समोरील भागाचा संपूर्ण चुराडा झाला. शिवाय सर्व कार रक्ताने माखली. भीषण अपघात झाल्याने गावकरी लगालोग अपघातस्थळी धावले. नागरिकांनी तातडीने ही माहिती पोलिसांना दिली.
पोलीस पथकाने देखील लगोलग घटनास्थळ गाठले. चुराडा झालेल्या कारमधील पाचही जखमींना तातडीने रुग्णालयात हलविले. जखमींमध्ये पती पत्नीसह तीन लहान लेकरं होती. सर्वांना शासकीय रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी तपासून तिघांना मृत घोषित केलं. तर सुदैवाने दोघे चिमुकले सुखरुप आहेत. या प्रकरणी पोलीस अधिक माहिती घेत आहेत. अपघात कसा झाला याबाबत नेमकी माहिती समोर आलेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.