मालेगावातील सभेची तयारी सुरु
मालेगावातील अद्वय हिरे यांनी नुकताच भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने अद्वय हिरे यांनी तयारी देखील सुरू केली आहे. येत्या २६ मार्चला मालेगावातील मसगा महाविद्यालयाच्या मैदानावर उद्धव ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आलं आहे. या सभेच्या तयारीला अद्वय हिरे यांनी सुरुवात केली आहे. सभेच्या प्रचाराची आणि जनजागृतीची सुरुवात देखील करण्यात आली आहे.
रामदास कदमांचं होमग्राऊंड गाजवल्यानंतर आता मालेगावात भुसेंना ललकारणार
उद्धव ठाकरेंची उत्तर महाराष्ट्रातील पहिली सभा मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुंबईत नेस्को सेंटरला सभा घेतली होती, त्यानंतर त्यांनी दसरा मेळाव्यात शिवाजी पार्क येथे शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं. बुलढाणा जिल्ह्यात देखील उद्धव ठाकरेंची एक सभा पार पडली. ५ मार्चला रामदास कदम यांच्या बालेकिल्ल्यास उद्धव ठाकरे यांची सभा यशस्वीपणे झाली. या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस मधून संजय कदम यांनी सेनेत प्रवेश केला. खेडची सभा यशस्वी झाल्यानंतर आता उद्धव ठाकरे पुढील सभा उत्तर महाराष्ट्रात घेत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेल्या दादा भुसे यांच्या होम ग्राउंड वर सभा घेत उद्धव ठाकरे आपली ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न करतील.