छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रातील शेतकरी शेतमालाला दर नसल्यानं अगोदरच संकटात सापडलेला आहे. कापूस, सोयाबीन, कांदा आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची दर पडल्यानं दयनीय अवस्था झाली आहे. शेतकऱ्यांपुढं बँकांची कर्ज कशी फेडायची असा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाकडून मोठ्या आशा होत्या. मात्र, गेल्या दोन तीन दिवसांपासून सुरु झालेल्या अवकाळी पावसानं त्या आशेवर देखील पाणी फिरवलं आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये गारपीट झाली आहे. गारपीट, पाऊस आणि वेगानं सुटणारा वारा यामुळं रब्बी हंगाम देखील शेतकऱ्यांच्या हातून जातो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत छत्रपती संभाजीनगरमधील शेतकरी आप्पासाहेब चव्हाण यांनी आपल्या शेताची झालेली दयनीय अवस्था पाहावली नाही. त्यांनी शेतातील आडव्या झालेल्या गव्हाच्या पिकावर झोपून स्वत:ला मारुन घेतलं. आप्पासाहेब चव्हाण यांचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

आप्पासाहेब चव्हाण यांना दु:ख अनावर

गंगापूर तालुक्यातील वजनापूर गावातील शेतकरी आप्पासाहेब जाधव यांनी त्यांच्या शेतात रब्बी हंगामात गव्हाचं पीक घेतलं होतं. रात्री झालेल्या पावसात आप्पासाहेब चव्हाण यांच्या शेतातील गहू आडवा झाला. गहू आडवा झाल्याचं पाहिलं आणि आप्पासाहेब चव्हाण यांचा संताप आणि दु:ख अनावर झालं. आप्पासाहेब चव्हाण यांनी आडव्या झालेल्या गव्हावर झोपतं स्वत: ला मारुन घेतलं. काल रात्रीपासून अवकाळी पावसानं काढणीला आलेल्या गहू, ज्वारी, कांदा आणि हरभऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संतोष जाधव यांनी दिली आहे. गंगापूर तालुक्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या हातून रब्बीचं पीक पूर्णपणे गेल्याचं जाधव म्हणाले. मान्सूनचा पाऊस लांबल्यानं खरीप हंगाम देखील हातून गेला होता. शेतकऱ्यांचं जे खरीप हंगामात नुकसान झालं होतं त्याची भरपाई अद्याप मिळालेली नाही, असं संतोष जाधव म्हणाले.

रब्बी हंगामही शेतकऱ्यांच्या हातून गेला

खरीप हंगामानंतर शेतकऱ्यांच्या आशा रब्बी हंगामावर होत्या. अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास निघून गेला आहे. शेतकऱ्यांनी दागिने गहाण ठेवून रब्बी हंगामात पीक आणलं होतं. मात्र, शेतकऱ्यांच्या हातून अवकाळी पावासानं रब्बी हंगामातील पीक देखील हिरावलं आहे, असं संतोष जाधव म्हणाले. शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. सरकारनं रखडलेलं अनुदान, रखडलेला विमा आणि नुकसानभरपाई म्हणून तातडीनं हेक्टरी २५ हजारांची नुकसानभरपाई द्यावी, असं संतोष जाधव म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here