पाण्याचा आणि रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर तसेच तीच ती पिके सतत घेतली जात असल्याने क्षारपड जमीनींचे प्रमाण वाढत आहे. देशात ६.३ दशलक्ष हेक्टर जमीन यामुळे नापीक झाली. त्यातील केवळ ७० हजार हेक्टर जमीन विविध प्रयोगाने सुपीक करण्यात आली. महाराष्ट्रात हे प्रमाण ६ लाख हेक्टर असून त्यातील साडे पाच हजार हेक्टरवर कृत्रिम निचरा प्रकल्प राबविण्यात आले. केवळ शिरोळ तालुक्यात २५ हजार हेक्टर जमीन नापीक झाले होते. यामुळे तालुक्यात वर्षाला हजार कोटींची शेती उत्पन्नाची उलाढाल ठप्प झाली होती. नापीक जमीनीमुळे गेल्या तीस वर्षापासून शेतकरी हवालदील झाला होता, त्याच्यावर मजूरी करण्याची वेळ आली होती.
शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी नापीक जमीनी पुन्हा पिकाऊ करण्याचे पाऊल दत्त साखर कारखान्याने उचलले. कारखान्याचे अध्यक्ष उद्यान पंडित गणपतराव पाटील यांचीच ही कल्पना. त्यांच्याच पुढाकाराने सच्छिद्र कृत्रिम निचरा प्रकल्पाची सुरूवात झाली. त्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना एकत्र केले. त्यांचे प्रबोधन केले. त्यासाठी येणारा खर्च शेतकऱ्यांना पेलवणारा नव्हता. तेव्हा उदगाव जयसिंगपूर अर्बन बँकेने मदतीचा हात पुढे केला.
प्रारंभी बुबनाळ गावात केवळ १५० एकर जमीनीवर हा सामुहिक प्रकल्प राबविण्यात आला. तो यशस्वी झाल्याचे लक्षात येताच शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळू लागला. त्यानंतर गावागावात क्षारपड जमीन सुधारणा सहकारी संस्था निर्माण झाल्या. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन हा प्रकल्प राबविण्यास सुरूवात केली. यातून बघता बघता तीन वर्षात तब्बल आठ हजार हेक्टर जमीन पिकाऊ करण्यात आली. ज्या जमिनीत काटेरी झुपडेच उगवावयची तेथे आता ऊसासह सर्व पीके शेतकरी घेत आहेत, काही जमीनींत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट वाढले आहे. यामुळे वार्षिक हजार कोटींची उलाढाल वाढली आहे. सध्या दोन हजार एकर जमीनीत या प्रकल्पाचे काम सुरू आहे. राज्यातील हा पहिलाच यशस्वी प्रकल्प आहे. यामुळे देशभरातील शेतकरी हा प्रकल्प पाहण्यास येत आहेत. तशी योजना त्यांच्या भागात राबविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे शिरोळ दत्त पॅटर्न हा क्षारपड जमीन मुक्तीचा आदर्श पॅटर्न म्हणून नावारूपाला येत आहे.
एकेकाळी अतिशय सुपीक असलेल्या जमीनीत तण आणि काटेरी झुपडे पाहून मनाला वेदना व्हायच्या. शेतकऱ्यांची हतबलता पाहून यासाठी काही तरी करण्याचा निर्णय घेतला. त्यातून सच्छिद्र निचरा प्रकल्पाचा मुहूर्तमेढ रोवली. आज हा प्रयोग यशस्वी झाल्याने शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद पाहून समाधान वाटते. संपूर्ण शिरोळ तालुका क्षारपडमुक्त करण्याचा निर्धार आहे.
गणपतराव पाटील, अध्यक्ष, दत्त साखर कारखाना, शिरोळ
एकेकाळी अतिशय सुपीक असल्याने या जमीनीत वर्षाला चार चार पीके घेतली जात होती. पण क्षारपड झाल्याने या जमीनीचे वाळवंटात रूपांतर झाले. आता मात्र नव्या प्रकल्पामुळे ती पिकाऊ होत असल्याने शेतकरी स्वत:हून पुढाकार घेत आहेत, असं ऊस विकास अधिकारी दिलीप जाधव यांनी सांगितलं.
दिलीप जाधव, ऊस विकास अधिकारी
आमच्या शेडशाळ गावातील जमीनी नापीक झाल्याने शेतकऱ्यांवर शेतमजूर होण्याची वेळ आली होती. पण, दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांच्या रूपाने आम्हाला देवच भेटला. त्यांच्यामुळे ही काळी आई पुन्हा एकदा जिवंत झाली. ज्यावर आज पिके डोलत आहे. हे सारे श्रेय त्यांचेच आहे.
महेश तारदाळ, शेतकरी
सच्छिद्र निचरा प्रणाली
जमीनीत साठलेले पाणी बंदिस्त पाईपव्दारे चेंबरमध्ये एकत्र केले जाते. सर्व शेतकऱ्यांच्या जमीनीतील हे पाणी तेथून थेट नदीत सोडले जाते. पूर्वी ते चरी मारून केले जात होते. पण त्यामध्ये अनेक अडचणी येत असल्याचे लक्षात आल्यानंतर राज्यात प्रथमच शिरोळमध्ये बंदिस्त निचरा प्रणाली राबविण्यात आली.
स्थळ, क्षारपड जमीन आणि सुधारणा
देश : ६.३ दशलक्ष हेक्टर ७० हजार हेक्टर
महाराष्ट्र : ६ लाख हेक्टर ५५०० हेक्टर
पश्चिम महाराष्ट्र : ७० हजार हेक्टर ११ हजार हेक्टर
शिरोळ : २५ हजार हेक्टर ८ हजार हेक्टर
धुळ्यात अवकाळी पावसासह गारपीट; शेती पिकांना फटका, गहूचं पीक मातीमोल!