पोलिसांनी सांगितले, की लोणंद एमआयडीसीतील पुष्पक कंपनीत कामासाठी आलेल्या सात कामगारांवर चाकू, काचेची बाटली तसेच लाकडी दांडक्याने केलेल्या हल्ल्यात दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. तर, पाच कामगार किरकोळ जखमी झाले आहेत. हा हल्ला त्याच कंपनीतील जुना कंत्राटदार अजय तात्याबा सावंत याच्या सांगण्यावरून केला असल्याची तक्रार परप्रांतीय कामगार दिनेश सिंग फुल सिंग राहणार मध्यप्रदेश सध्या राहणार गोळेगाव याने लोणंद पोलिसात दिली आहे.
या हल्ल्यात दिनेश सिंग फुल सिंग याच्यासह श्रवन कुमार भुईया हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत, तर राजन कोरचे, राम गोपाल साकेत, सुभाष पठारे, राजेश कुमार चौधरी आणि अन्य असे पाचजण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमीवर लोणंद येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
फलटणचे उपविभागीय पोलीस अधिक्षक तानाजी बरडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी लोणंद पोलिसात कंत्राटदार अजय सावंत यांच्यासह अन्य सहाजणांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा लोणंद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर हे तपास करीत आहेत.