आजदे पाडा येथे रात्री १० वाजून १६ मिनिटांनी सार्वजनिक होळी पेटवल्यानंतर उपस्थित तरुण रंगाने भरलेल्या पाण्याचे फुगे एकमेकांवर फेकून आनंदोत्सव साजरा करत होते. बोंब ठोकून आनंद लुटला जात होता. ही मौजमजा सुरू असताना एका तरुणाने जवळच असलेल्या एका तरुणाच्या दिशेने पाण्याचा फुगा फेकला. त्याचा राग दुसऱ्या गटातील तरुणाला आला. त्याने पाण्याचा फुगा का फेकून मारलास ? असा जाब फेकणाऱ्या तरुणाला विचारला. यावरुन दोघांमध्ये शाब्दिक चकमकी झडल्या. त्याचे पर्यावसन थोड्याच वेळात जोरदार हाणामारीत झाले.
तरुणांमध्ये सुरू असलेल्या हाणामारीमुळे एकमेकांचे समर्थक आमने-सामने आले. त्यानंतर दोन गट तेथे तयार झाले. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले. वाद मिटत असताना एका तरुणाने लाकडी काठी प्रतिस्पर्ध्याच्या दिशेने फिरकावली. हा वाद वाढून कायदा, शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून उपस्थित काही जाणकार मंडळींनी पुढाकार घेऊन वाद मिटविला. दोन्ही गटांना शांततेचे आवाहन केले.
हिंसक प्रकरानंतर होळी खेळण्यासाठी आलेले इतर तरुण, महिला, तरुणी तेथून निघून गेल्याचे जाणकारांनी सांगितले. विशेष म्हणजे घटनास्थळी दुकानदारांनी लावलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हिंसाचाराचा प्रकार कैद झाला आहे. या फुटेजमध्ये १० वाजून ४० मिनिटांनी सदर ठिकाणी दोन गटांत तुंबळ हाणामारी सुरू असल्याचे दिसून येते. पोलिसांनी हे फुटेज ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.