देशात महिला आजही असुरक्षिततेच्या छायेत असल्याचे महिला व बालविकास खात्याने केलेल्या पाहणीत स्पष्ट दिसते. प्रगती अन् पुरोगामीपणाचा दावा करणारा महाराष्ट्रही महिलांच्या सुरक्षिततेबाबत पिछाडीवर असून, सार्वजनिक ठिकाणी नाशिकही महिलांसाठी असुरक्षित असल्याची भावना ५६ टक्के महिलांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ने केलेल्या पाहणीतून नोंदविली. ६४ टक्के महिलांनी नातेसंबंध, मित्र परिवारात वावरताना घुसमट सहन करावी लागत असल्याचे म्हटले आहे.
सार्वजनिक ठिकाण असो किंवा हक्काच्या घराचा परिसर, रिक्षा-बससारखी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असो किंवा सोशल मीडियाचे व्यासपीठ, अशा सर्वच ठिकाणी महिलांच्या मनात असुरक्षिततेची भावना घर करताना दिसते. जागतिक महिला दिनानिमित्त ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ऑनलाइन सर्वेक्षणात पाचशे महिलांनी सहभाग घेत आपली मते आणि समस्या मांडल्या. ‘मटा’च्या सर्वेक्षणात विचारलेल्या दहा प्रश्नांची उत्तरे महिलांनी दिली. यात शहरातील सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करताना ५६ टक्के महिलांनी असुरक्षिततेची भावना असल्याचे म्हटले. त्यांचा रोख काही रिक्षाचालकांच्या वागणुकीवर आणि प्रवासादरम्यान सहप्रवाशांच्या त्रासावर अधिक दिसला. हे बदलण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
‘महिलांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होते का?’ या प्रश्नाला उत्तर देताना ७९ टक्के महिलांनी ‘महिलांच्या मूलभूत प्रश्नांवर गाजावाजा होतो. मात्र, परिस्थिती काही बदलत नाही,’ अशी प्रतिक्रिया दिली. महिलांच्या मूलभूत प्रश्नांबाबत अवहेलनाच अधिक दिसत असल्याचेही त्या नोंदवितात. ६८ टक्के महिला कौटुंबिक हिंसाचार हा गंभीर, चिंतेचा विषय असल्याचे सांगतात. महिला सर्वच क्षेत्रांत प्रगती करीत असल्या, कामाच्या ठिकाणी समानतेची वागणूक मिळू लागली असली, तरी नातेसंबंध, मित्र परिवारात वावरताना ६४ टक्के महिलांना घुसमट सहन करावी लागते, हे निरीक्षणही त्या नोंदवितात.
सोशल मीडियावर महिलांचा वावर वाढला असून, ३३ टक्के महिलांना तो असुरक्षित वाटतो, तर सोशल मीडियाची योग्य दक्षता आणि प्रशिक्षण घेऊन हाताळणी केली, तर तो महिलांसाठी सुरक्षित असल्याचे ६४ टक्के महिलांना वाटते. आपणच सोशल मीडियाचा वापर योग्य कारणांसाठी आणि सुरक्षितपणे केला, तर चुका होणार नाहीत, असे मतही त्या नोंदवितात.
आयुक्तांनी व्हावे ‘संवादी’
गुन्हेगारी कमी करायची असेल, तर संवाद वाढवायला हवा, अशी भूमिका शहर पोलिस आयुक्त अंकुश शिंदे व्यक्त करतात. याचाच आधार घेत ‘मटा’च्या सर्वेक्षणात ‘शहर पोलिस आयुक्तांनी दर महिन्याला ज्येष्ठ महिलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी लोकअदालतीसारखा ‘संवाद’ उपक्रम घ्यावा, असे वाटते काय?’ असा प्रश्न महिलांना विचारला होता. यावर ९४ टक्के महिलांनी हो, याची खूप गरज असल्याचे मत नोंदविले. अनेकदा पोलिस ठाण्यात दखल घेतली जात नाही, अशावेळी थेट आयुक्तांशी संवाद साधायला मिळाला, तर पोलिसांबद्दलची सर्वसामान्यांच्या मनातील भीती कमी होईल आणि गुन्हेगारांच्या मनातील पोलिसांबद्दलची भीती वाढेल, अशी अपेक्षाही महिला व्यक्त करतात.
नाशिकमध्ये नोकरीत सन्मानाची वागणूक
सार्वजनिक ठिकाणी महिलांना असुरक्षित वाटत असले, तरी नोकरीच्या ठिकाणी महिलांना सन्मानपूर्वक वागणूक मिळत असल्याचे आशादायक चित्र नाशिकमध्ये असल्याचे य सर्वेक्षणातून स्पष्ट होते. ७० टक्के महिलांना कामाच्या ठिकाणी सन्मानाची वागणूक मिळते, असे वाटते, तर १८ महिला काही प्रमाणात सन्मानाची वागणूक मिळते, असे मत नोंदवितात. १० टक्के महिलांनी सांगता येत नाही, असे नमूद केले.