३२ वर्षांच्या पवन सिंहनं त्याच्या पत्नीच्या मृतदेहाचे तुकडे घरावर असलेल्या पाण्याच्या रिकामी टाकीत लपवले होते. दोन महिन्यांपूर्वीच सती साहूचा खून झाला होता. मात्र त्याबद्दल कोणालाच कोणतीही माहिती नव्हती. पोलीस पवन सिंहच्या घरी बोगस नोटा ताब्यात घेऊन त्याला अटक करण्यासाठी पोहोचले. पोलिसांनी पवनच्या घरात दुर्गंधी येत होती. ही दुर्गंधी नेमकी कुठून येतेय याचा माग पोलिसांनी काढला. घरावर असलेल्या टाकीतून दुर्गंधी येत असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. पोलिसांनी टाकी उघडली, त्यावेळी त्यांना आतमध्ये महिलेचा मृतदेह पाच भागांत कापलेला आढळून आला.
पोलिसांनी मृतदेहाचे तुकडे बाहेर काढले. आरोपी पवन सिंह भाड्यानं घेतलेल्या घरात राहत होता. पत्नीच्या मृतदेहाचे तुकडे विविध भागांत फेकण्याची योजना पवननं आखली होती. मात्र त्याला वेळ मिळाला नाही. पवन आपल्याला त्रास देत असून त्यानं हत्येची धमकीही दिल्याचा दावा पीडित सती साहूनं केला होता. तिनं या संदर्भात आरोपीविरोधात पोलीस तक्रारही दाखल केली होती. मात्र पोलिसांनी त्याकडे गांभीर्यानं लक्ष दिलं नाही. पंधरा दिवसांपूर्वी सतीचा एक नातेवाईक तिच्या भेटीसाठी घरी गेला होता. त्यावेळी पवननं सती घरात नसून लवकरच परत येईल, असं त्या नातेवाईकाला सांगितलं होतं.
पोलिसांना पवनच्या घरात कलर प्रिंटर, फोटोकॉपी करण्यात आलेले कागद आणि ५०० आणि १००० रुपयांच्या बोगस नोटा सापडल्या. ‘पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपीनं पाण्याची टाकी आणि कटर मशीन खरेदी केली. त्यानं पत्नीच्या मृतदेहाचे पाच तुकडे केले. हे तुकडे पेटवून देण्याचा प्रयत्न त्यानं केला. मात्र मृतदेह पेटवल्यास दुर्गंधी पसरेल या भीतीनं त्यानं तुकडे टाकीतच लपवून ठेवायचं ठरवलं,’ अशी माहिती बिलासपूरचे पोलीस अधीक्षक संतोष सिंह यांनी दिली.