अवकाळी पाऊस आणि वादळी वार्याने पुन्हा शेतकर्यांच्या स्वप्नांवर टाच आणली आहे. ६ मार्चला रात्री झालेल्या पावसाने नांदुरा तालुक्यातील २३ गावातील ७७५ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याची शासकीय आकडेवारी आहे. होळीची सुट्टी असल्याने, इतर ठिकाणचे पीक नुकसान अद्याप समोर आले नाही. आधीच खरीप हंगाम ‘पाण्यात’ गेलाय. रब्बी पिकांवर भिस्त होती. संकटातून सावरलेल्या जिल्ह्यातील शेतकर्यांनी मोठ्या उमेदीने पदरमोड करून ३,०६,३१५ हेक्टरवर पिकांची लागवड केली. यंदा २१,८३०० हेक्टरवर हरभरा हे पीक घेण्याकडे शेतकर्यांचा कल होता.
गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि वादळी वार्याने रात्रीचा कहर चालवला असून, जिल्ह्यातील शेतकर्यांच्या रब्बी पीक उत्पादनाच्या आशेवर देखील पाणी फेरले आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत या अवकाळी पावसाने शेती पिकांचे अतोनात नुकसान केलेले आहे.
तूर, सोयाबीन, कापूस या ठिकाणी उत्पन्नाच्या तुलनेत भावामध्ये फक्त तेजी-मंदीचा खेळ सुरु आहे. शेतकऱ्यांना पाहिजे तसा भाव मागील वर्षाच्या तुलनेत मिळाला नाही. रब्बी हंगामात हाता तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतलेला आहे.
खरीप गेला आता रब्बी हंगाम हातून जातोय त्यामुळं पुढच्या हंगामाची तयारी कशी करावी या विवंचनेत शेतकरी अडकलेला आहे. निसर्गाची बदलती स्थिती, अवकाळी पाऊस आणि बाजारात शेतमालाला योग्य दर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांपुढील संकटं वाढत आहेत.
बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. काही दिवसांपूर्वी एका मेंढपाळाचं मोठं नुकसान झालं होतं. मध्यरात्री वीज कोसळून मेंढपाळाच्या १६ मेंढ्या दगावल्या होत्या. त्यामध्ये त्यांचं ५ लाख रुपयांचं नुकसान झालं होतं.