chinese centre owner killed adivasi youth, Raigad : चायनिज सेंटरवर बिलावरून वाद, नेपाळी मालकाची मारहाण, आदिवासी तरुणाची हत्या – nepali chinese centre owner killed adivasi youth over bill in vadkhal raigad
रायगड : कोकणात शिमगोत्सवाची सुरू असतानाच रायगड जिल्ह्यात वडखळ येथे एका चायनिज सेंटरच्या नेपाळी मालकाकडून आदिवासी युवकाची हत्या करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सणाची धामधूम सुरू असताना वडखळ येथील साई एकविरा चायनिज सेंटरवर झालेल्या मारामारीत चायनिज सेंटरच्या नेपाळी मालकाने आदिवासी तरुणी विजय हरीचंद्र पवार (२४, रा. वावे, नवेगाव) वाडी वडखळ याची हत्या केली. यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेनंतर येथील वातावरण तणावग्रस्त झाले. तर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला होता. या हत्येची खबर वडखळ पोलिसांना मिळताच साई एकविरा चायनिज सेंटरवर येवून येथील परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. पळून गेलेल्या आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली.
वडखळ येथील साई एकविरा सेंटरमध्ये झालेल्या मारामारीत विजय पवार या युवकाला नेपाळी मालकाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या विजय पवार याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मृत विजय पवारचे नातेवाईक आणि वाडीतील ग्रामस्थ यांनी वडखळ पोलीस ठाण्यात न्याय मागण्यासाठी धाव घेतली व तेथेच ठिय्या अंदोलन केले. अनुचित प्रकार घडू नये यासाठी वडखळ पोलीस ठाण्यात पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी हत्येच्या गुन्ह्याची नोंद केली आहे, अशी माहिती माहिती पोलीस उपअधीक्षक संजय शुक्ला व पोलीस निरिक्षक तानाजी नारनवर यांनी दिली आहे. वडखळ हद्दीत ही संतापजनक घटना घडली असून यातील आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी विजयची पत्नी तसेच कुटुंब व येथील सरपंच राजेश मोकल यांनी केली आहे. या धक्कादायक घटनेने स्थानिकांमध्ये संतप्त भावना आहेत आणि पोलिसांवर कारवाईसाठी दबाव वाढत आहे.