शहनाझ हुसैन आज एक देश-विदेशातील चर्चित नाव आहे. त्यांची हर्बल कॉस्मेटिक उत्पादने फक्त भारतातच नव्हे तर विदेशात प्रसिद्ध आहेत. शहनाज हुसैन ही अशी एक महिला उद्योजिका आहे ज्यांचे नावच एक ब्रँड बनले. मात्र, यशाचा हा मार्ग त्यांच्यासाठी सोपा नव्हता. वयाच्या १५व्या वर्षी लग्नापासून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात घराच्या व्हरांड्यातून सौंदर्य उत्पादने विकण्यापासून केली. घरची सगळी जबाबदारी त्यांच्यावर आली, आणि त्यांनी देखील खचून न जाता अडचणींवर मात करण्याचा निर्णय घेतला. पुढे शहनाज यांनी हर्बल आणि आयुर्वेदिक उत्पादने बनवून संपूर्ण जगात ठसा उमटवला.
शहनाझ हुसैन यांची वाटचाल
यशस्वी उद्योजक बनण्याचा प्रवास शहनाझ हुसैन यांच्यासाठी कधीच सोपा नव्हता. वयाच्या १४ व्या वर्षी त्यांचा साखरपुडा झाला तर १५ व्या वर्षी लग्न झाले. अशा प्रकारे लहान वयातच त्यांच्यावर जबाबदाऱ्यांचे ओझे पडले. पण त्यांनी जबाबदाऱ्यांचं ओझं कधीच जाणू दिलं नाही. त्या फक्त घरात पत्नी आणि आईच्या भूमिकेपुरती मर्यादित राहणार नाही, असा त्यांनी आधीच निर्धार केला होता.
त्यांचे वडील न्यायमूर्ती नसीर उल्लाह बेग अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. आणि वडिलांच्या मदतीने त्यांनी हेलेना रुबिनस्टाईन शाळेत प्रवेश घेतला. येथून ब्युटी टेक्निकचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी जर्मनीमध्ये संबंधित अभ्यास पूर्ण केला. आणि भारतात परतल्यावर त्यांनी स्वतःची कॉस्मेटिक कंपनी सुरू केली.
व्हरांड्यातून उत्पादने विकली
व्यवसायाच्या सुरुवातीला शहनाझ यांनी घरातील व्हरांड्यातून आपली उत्पादनांच्या विक्रीला सुरुवात केली. त्या काळात त्यांचा स्टार्टअप इतका यशस्वी होईल याची त्यांनी कल्पना देखील केली नव्हती. इथं पासून त्या यशाच्या रथावर स्वार झाल्या. लवकरच शहनाझ हुसैन सौंदर्य उद्योगातील एक प्रसिद्ध व्यक्ती बनल्या. त्यांची सौंदर्य उत्पादने जगातील अनेक देशांमध्ये विकली जाऊ लागली. आपली नैसर्गिक उत्पादने बनवताना त्यांनी कधीही रासायनिक आणि कृत्रिम सुगंधाचं वापरला केला नाही आणि हाच त्यांच्या उत्पादनांचा यूएसपी (आकर्षक पॉईंट) बनला.
पहिले हर्बल क्लिनिक
शहनाज हुसैन यांचे सुरुवातीचे शिक्षण प्रयागराजच्या सेंट मेरी कॉन्व्हेंट इंटर कॉलेज येथे झाले. शहनाझचे पती नासिर हुसेन तेहरानमध्ये तैनात असताना त्यांनी आयुर्वेदाचा अभ्यास केला. यानंतर त्यांनी कॉस्मेटिक थेरपी आणि कॉस्मेटोलॉजीचे प्रशिक्षणही घेतले. शहनाझने भारतात परतल्यावर १९७१ मध्ये त्यांनी पहिले हर्बल क्लिनिक सुरु केले आणि पुढच्या काही वर्षांत त्यांनी ‘द शहनाझ हुसैन ग्रुप’ची स्थापना केली. शहनाझला उद्योग क्षेत्रात अनेक सन्मान मिळाले असून २००६ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.