पुढे भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले गोकुळ देवरे यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला. पत्नी पोलीस दलात, तर पती भारतीय सैन्य दलात…देशसेवा आणि समाजसेवा करण्याचा मान देवरे दाम्पत्याच्या नशिबी होता. अश्विनी यांना अनिकेत आणि शौर्य अशी दोन मुलं आहेत.
जिद्दीच्या जोरावर सकाळी ड्युटी असल्याने पहाटे ३ वाजता उठून आपल्या दोन लहान मुलांना घरात सोडून सायकलिंग, स्विमिंग आणि रनिंगचा सराव करायच्या. पोलीस म्हणून समाजसेवेचं कर्तव्य पार पाडणं आणि एक गृहिणी म्हणून घराचा सांभाळ करणं, आई म्हणून मुलांकडे लक्ष देणं या सर्व गोष्टी जोपासत अतिशय खडतर परिस्थितीमध्ये त्यांनी यशाच्या शिखरापर्यंत मजल मारली.
अश्विनी देवरे यांनी कझाकिस्तानमध्ये झालेल्या ट्रायथलॉन स्पर्धेत आर्यनवुमन तिरंगा फडकवला. हा किताब पटकावणाऱ्या त्या पहिल्या महिला पोलीस ठरल्या. महाराष्ट्र पोलीस दलातर्फे नाशिक पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस अश्विनी देवरे या ४० ते ४४ वयोगटात सहभागी झाल्या.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील अवघड समजल्या जाणाऱ्या ट्रायथलॉन स्पर्धेत ३.८ किलोमीटर पोहणं, सायकलिंग १८० किलोमीटर आणि ४२.२ किलोमीटर धावणं सलग १७ तासात पूर्ण करावं लागतं. मात्र हे तिन्ही टप्पे अश्विनी यांनी १४ तास २४ मिनिटे ४६ सेकंदात पूर्ण केले. त्यांनी २ तास १ मिनिट ४२ सेकंदात स्वीमिंग, ७ तास ९ मिनिटे ३३ सेकंदात सायकलिंग आणि ४ तास ५३ मिनिटे ३२ सेकंदात रनिंग पूर्ण केली. त्यांचा स्पर्धेदरम्यानचा ट्रानिझिस्ट टाईम २० मिनिटे होता.
संसार सांभाळून पोलीस दलातील नोकरी करत श्रीलंका, मलेशिया तसंच भारतातील अनेक मॅरेथॉन स्पर्धेत त्या सहभागी झाल्या आहेत. आतापर्यंत त्यांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये ४० सुवर्ण, २१ रौप्य, २८ कांस्य पदकं पटकावली आहेत. अश्विनी देवरे या २००१ मध्ये मुंबई पोलीस दलात सामील झाल्या होत्या. त्यानंतर त्यांची बदली होऊन त्या सध्या नाशिकमध्ये कार्यरत आहेत.