काँग्रेस-राष्ट्रवादीत सत्ता वाटप होऊन अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे तर उपाध्यक्षपद काँग्रेसकडे आहे. विरोधीपक्ष नेते अजित पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सत्ता चालते. रिक्त झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठीही या दोघांच्या उपस्थितीत कालच बैठक झाली. त्यामध्ये उमेदवार ठरणे अपेक्षित होते. मात्र, त्यावरूनच मतभेद झाल्याची माहिती आहे. यासाठी घुले यांच्यासह आणखी काही जण इच्छुक होते. मात्र, घुले यांचे नाव निश्चित होत असल्याने त्यांच्यात नाराजी पसरल्याचे सांगण्यात येते.
याच नाराजीचा फायदा खासदार सुजय विखे पाटील आणि माजी आमदार कर्डिले यांनी उठविल्याचे सांगण्यात येते. कारण महाविकास आघाडीचे बहुमत असल्याने भाजप अलिप्त राहील, असा अंदाज होता. प्रत्यक्षात मात्र भाजपने खेळी करून खुद्द कर्डिले यांनाच रिंगणात उतरविले. त्यामुळे घुले आणि कर्डिले यांच्यात सरळ लढत झाली.
प्रत्यक्ष २० मतांपैकी एक मत बाद झाले. घुले यांना नऊ तर कर्डिले यांना दहा मते मिळाली. त्यामुळे कर्डिले यांना विजयी घोषित करण्यात आले. सहा जागा असलेल्या भाजपला चार मते अधिकची मिळाली. ही मते नेमकी कोणाची फुटली? याची आता चर्चा सुरू आहे.
या निवडीनंतर खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, बँकेचा कारभार पक्षविरहीत चालावा अशी येथील पद्धत आहे. मात्र, अध्यक्षपदाच्या निवडीमध्ये हे दिसून आले नाही. त्यामुळे आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागला.
विरोधीपक्ष नेते अजित पवार यांना विखे व कर्डिले यांनी दिलेला हा मोठा धक्का मानला जात आहे. पवार यांनी काल स्वत: नगरला येऊन बैठक घेतली होती. शेवटच्या क्षणापर्यंत राष्ट्रवादीचा अध्यक्ष होईल असे वाटत होते. सुरवातीला केवळ घुले यांचाच अर्ज आला. मात्र, शेवटच्या काही मिनिटांत सूत्रे फिरली आणि भाजपचे कर्डिले यांचाही अर्ज दाखल करण्यात आला.
अध्यक्षपदाचा उमेदवार पवार ठरविणार असे सांगण्यात आले होते. काल त्यांनी ठरविला असला तरी जाहीर झाला नव्हता. मात्र जेव्हा घुले यांचा अर्ज दाखल झाला, तेव्हा त्यांचे नाव ठरल्याचे आणि आता बिनविरोध निवड होणार, असे वाटत असल्याने तशी चर्चाही बाहेर सुरू झाली. मात्र, शेवटच्या क्षणी कर्डिले यांचा अर्ज आला. निवडणूकही झाली आणि महाविकास आघाडीची मते फोडून कर्डिले अध्यक्षही झाले.
तटकरे-गीतेंच्या लढाईत फडणवीसांचा नवा शिलेदार, २०२४ ला रायगडात कमळ फुलणार?